सात कोटी ७५ लाखांची महापालिकेची शाळा धूळखात

नेरूळ सेक्टर ३० येथे नवी मुंबई मनपाने सुमारे ७ कोटी ७५ लाख खर्च करून महानगरपालिकेने सुसज्ज अशी शाळा बांधली आहे.
सात कोटी ७५ लाखांची महापालिकेची शाळा धूळखात
Published on

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ३० येथे नवी मुंबई मनपाने सुमारे ७ कोटी ७५ लाख खर्च करून महानगरपालिकेने सुसज्ज अशी शाळा बांधली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभी केलेली ही इमारत विद्यार्थ्यांविना धूळखात पडून आहे. या प्रकरणी शिवसेना (उबाठा) उपशहर प्रमुख यांनी आयुक्तांना शाळा सुरू करावी, असे निवेदन दिले असून शाळा जून मध्ये सुरू न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

नेरूळ सेक्टर ३० येथील भूखंड क्रमांक ८अ ए येथे भव्य शाळा इमारत बांधण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडे इमारत सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र गेले अनेक महिने ही इमारत धूळखात पडून आहे. सुमारे ७ कोटी ७५ लाख खर्च करून महानगरपालिकेने सुसज्ज अशी शाळा बांधली आहे. या शाळेचे काम पूर्ण झाले असून अभियांत्रिकी विभागाने या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन ही इमारत ११ नोव्हेंबर २०२४ रोजी मालमत्ता विभागास हस्तांतरित केली. मालमत्ता विभागाने त्यांच्या विभागाची कार्यपूर्तता करून ३० जानेवारीला शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करत असल्याचे पत्र दिल्याचा दावा शिवसेना (उबाठा) उपशहर प्रमुख समीर बागवान यांनी केला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर-५० येथील शाळाक्रमांक ९३ या शाळेमध्ये सीबीएससी शिक्षण पद्धतीनुसार बालवाडी ते इयत्ता आठवीपर्यंत प्रवेश प्रक्रियेसाठी ५२५ पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले होते, यातील ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. एकीकडे एवढी मोठी प्रतीक्षा यादी आहे, जी शाळा आहे त्यात जागा कमी पडत आहे, तर दुसरीकडे शाळा इमारत उभी असून सर्व व्यवस्था असताना शाळा सुरू केली जात नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील मुलांवर अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेली इमारत धूळखात पडून आहे. ही शाळा लवकरात लवकर सुरू करावी. आम्ही आयुक्त यांना निवेदन दिले आहे. जर शाळा सुरू झाली नाही, गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल तसे झाले तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.

- समीर बागवान, (उपशहर प्रमुख-शिवसेना)

तांत्रिक बाब पूर्ण करून शाळा सुरू करण्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागेल. आम्ही लवकरात लवकर शाळा सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

- संघमित्रा खिलारे,

(उपायुक्त शिक्षण विभाग)

logo
marathi.freepressjournal.in