स्वच्छतेत पालिका २४ व्या स्थानावर ;स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ मध्ये ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी

स्वच्छ सर्वेक्षण- २०२३ मध्ये ठाणे शहराने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. २०२२ मध्ये सहभागी सर्व शहरांत गुणानुक्रमानुसार ठाणे शहराचा ४४ वा क्रमांक आला होता. त्यावरून झेप घेत यंदा ठाणे शहराने २४ वे स्थान पटकावले आहे.
स्वच्छतेत पालिका २४ व्या स्थानावर ;स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ मध्ये ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात स्वच्छतेला दिलेले सर्वोच्च प्राधान्य, शहराची एकूण स्वच्छता आणि शौचालयांची स्वच्छता हे उद्दिष्ट ठेवून प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांची परिणिती म्हणून स्वच्छ सर्वेक्षण- २०२३ मध्ये ठाणे शहराने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. २०२२ मध्ये सहभागी सर्व शहरांत गुणानुक्रमानुसार ठाणे शहराचा ४४ वा क्रमांक आला होता. त्यावरून झेप घेत यंदा ठाणे शहराने २४ वे स्थान पटकावले आहे.

महानगरपालिकेने वर्षभर स्वच्छतेसाठी निरनिराळे उपक्रम हाती घेतले. दररोज कचरा टाकला जिथे कचरा टाकला जात असे अशा १५० हून अधिक जागांवरील कचरा टाकणे पूर्णपणे थांबविण्यात आले. तसेच, घरोघरी कचरा संकलन करण्याची क्षमता वाढवून प्रत्येक घरी कचरा संकलन गाडी गेलीच पाहिजे, या सूत्रानुसार कचऱ्याचे संकलन सुरू करण्यात आले. रस्ते सफाईच्या कामांना सकाळी सहा वाजता सुरुवात करून आठ वाजेपर्यंत मुख्य रस्त्यांची सफाई पूर्ण करणे, स्वच्छता कर्मचारी पूर्णवेळ कर्तव्यावर हजर असणे, बाजारपेठा आणि दुकानांच्या परिसरात सायंकाळी आणि रात्री साफसफाई करणे, यांत्रिक सफाईला सुरुवात अशा सर्वांगीण प्रयत्नांचे फलस्वरूप म्हणून स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये ठाणे शहराची कामगिरी मोठ्या प्रमाणावर सुधारलेली दिसते आहे.

स्वच्छता सर्वेक्षण-२०२३ मध्ये देशभरातील ४४६ हून अधिक शहरात ठाण्याला २४ वा क्रमांक मिळाला आहे. गेल्या वर्षी ४२७ शहरात ठाणे शहराला ४४ वा क्रमांक मिळाला होता. एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात ठाण्याचे स्थान २४ वे आहे. तर, दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत ठाण्याला १४ वे स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी ठाण्याचा १३ वा क्रमांक होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या स्वच्छता आणि सुशोभीकरण मोहिमेत, ठाणे शहर स्वच्छ बनवणे हा एकच ध्यास घेऊन गेले वर्षभर स्वच्छता कर्मचारी परिश्रम घेत आहेत. त्यामुळेच ठाणे शहराच्या एकंदर गुणानुक्रमात मोठ्या प्रमाणावर वृद्धी झाली आहे. ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे.

ठाणे शहराची क्षमता आणि नागरिकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन ठाणे शहर देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या सर्वोच्च पातळीवर नेण्याचे उद्दिष्ट साध्य करणे हे पुढील ध्येय आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळेच ठाणे शहर बदलते आहे, स्वच्छ होत आहे. याची जाणीव ठेवून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून अधिक जबाबदारीने वागू व पुढील सर्वेक्षणात देशातील पहिल्या १० स्वच्छ शहरात येण्यासाठी प्रयत्न करू.

- अभिजीत बांगर, महापालिका आयुक्त

ठाणे शहराला वॉटर प्लस शहराचा बहुमान

ओडीएफ (हागणदारीमुक्त) श्रेणीतील सर्वोच्च असा 'वॉटर प्लस' शहरात ठाण्याला प्रथमच मिळू शकला आहे. पाण्याचे नियोजन, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर, सांडपाण्यावर प्रक्रिया या मुद्यांवर 'वॉटर प्लस' शहराचे मूल्यांकन केले जाते. हागणदारी मुक्तता, मलनिस्सारण प्रकल्पांची कार्यक्षमता याबाबत ठाणे महापालिका क्षेत्रातील कामगिरी चांगली असल्याने शहराला प्रथम 'ओडीएफ ट्रीपल प्लस' हा बहुमान मिळाला होता. आता त्यापुढील 'वॉटर प्लस' मानांकन मिळाले आहे. 'ओडीएफ ट्रीपल प्लस' प्रमाणपत्रासोबतच, मलजलशुद्धीकरण प्रकल्पातून प्रक्रिया केलेल्या किमान २० टक्के सांडपाण्याचा पुनर्वापर करणे, तसेच, मलजलशुद्धीकरण प्रकल्प चालवण्यासाठी व त्याची देखभाल करण्यासाठी लागणारा खर्च हा स्वच्छता करातून पूर्ण करणे या दोन मुख्य निकषांची पूर्तता करावी लागते. यात देखील आपल्याला चांगले काम करायचे आहे.

logo
marathi.freepressjournal.in