
ठाणे : खबरदारीचा उपाय म्हणून दरवर्षी ठाणे महापालिका शहरातील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींना नोटीस बजावत असते. यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच महापालिकेने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. ठाणे शहरात ९६ अतिधोकादायक तर ४ हजार ४०७ इमारती या धोकादायक ठरल्या आहेत. त्यानुसार अतिधोदायक या इमारतीत वास्तव्यास असलेल्या २०७५ कुटुंबांना या नोटीस प्रभाग समितीनिहाय बजावल्या जात आहेत
अतिधोकादायक इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्यास सांगितले जाणार आहे. इमारती रिकाम्या झाल्यावर पालिका त्यावर तोडक कारवाई करीत असते. त्यानुसार आता शहरातील ९६ अतिधोकादायक इमारतधारकांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत इमारती रिकाम्या करण्याची नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार या इमारतीत वास्तव्यास असलेल्या २०७५ कुटुंबांना प्रभाग समितीनिहाय नोटीस बजावल्या जात आहेत.
ठाणे महापालिकेने शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. त्यानुसार शहरात ९६ इमारती या अतिधोकादायक यादीत येत असून त्या इमारती खाली करून त्या पाडण्याची कारवाई पालिकेने सुरू केली आहे. पुढे जाऊन आता ज्या इमारती अतिधोकादायक असून त्या इमारती रिकामी करण्यात आलेल्या नाहीत, अशा इमारतधारकांना पालिकेने नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. येथील इमारतधारकांनी पर्यायी व्यवस्था पहावी, असे आवाहनही पालिकेमार्फत करण्यात आले आहे.
वागळे इस्टेट, मुंब्य्रात सर्वाधिक इमारती
अतिधोकादायक इमारतींमध्ये सवार्धिक ६३ इमारती या एकट्या नौपाडा प्रभाग समितीत आहेत, तर सी २ ए या प्रकारातही येथ २१ इमारतींचा समावेश आहे. दुसरीकडे वागळे इस्टेट भागात १०८८ इमारती या धोकादायक इमारती असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यातही मुंब्य्रात अतिधोकादायक आणि धोकादायक इमारती या १३४३ एवढ्या आहे. त्यानुसार ज्या अतिधोकादायक इमारती आहेत, त्या रिकाम्या करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. ९६ पैकी २५ इमारती व्याप्त असून त्या रिकाम्या करण्याचे कसब पालिकेला दाखवावे लागणार आहे. या वाणिज्य १५१ दुकाने असून ५४७ कुटुंब आणि इमारतीत राहणाऱ्या कुटुंबाची संख्या २०७५ एवढी आहे.
चार टप्प्यांत वर्गीकरण
ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे सी-१, सी-२ ए, सी-२बी आणि सी-३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण केले आहे. सी-१ म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तत्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत, सी-२ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे, सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे आणि सी-३ म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे.
मागील वर्षापेक्षा यंदाचा आकडा अधिक
शहरात ९६ इमारती या अतिधोकादायक यादीत येत असून त्या इमारती खाली करून त्या पाडण्याची कारवाई पालिकेने सुरू केली आहे. त्यातील २५ इमारती या आजच्या घडीला व्याप्त आहेत. तसेच १५ इमारतीवर तोडक कारवाई करण्यात आली असून १० इमारतींचे धोकादायक बांधकाम काढलेले आहे. धोकादायक इमारतींमध्ये ४ हजार ४०७ इमारतींचा समावेश आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा अतिधोकादायक इमारतींची संख्या ही १० ने तर धोकादायक इमारतींची संख्या ही ११० ने वाढली आहे.