मुरबाडच्या सोन्याची झळाळी सर्वत्र पसरली

मुरबाडच्या सोन्याची झळाळी सर्वत्र पसरली

सोने खरेदीसाठी मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसह महाराष्ट्रातील व इतर राज्यातील सोनेग्राहकांनी मुरबाडमध्ये हजेरी लावल्याने मुरबाडमध्ये सोन्याची विक्रमी खरेदी झाली आहे. मुरबाडच्या सोन्याची झळाळी सर्वत्र पसरली असून सध्या मुरबाड हे ‘गोल्ड सेंटर’ बनले आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

मुरबाडमधील सोन्याची कलाकृती आणि चमक आगळीवेगळी असल्याने तसेच ४ कॅरेटच्या सोन्यावर असणारे हॉलमार्क हे चिन्हदेखील खात्रीलायक असून या सोन्याला सर्वत्र मागणी आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईत कपड्यांची खरेदी जरी मुंबई, गुजरातमध्ये होत असली तरी नववधूंचे आणि वराचे दागिने मात्र मुरबाडमध्ये खरेदी करण्यासाठी सर्वांची पसंती मिळत आहे. सोन्याचे दर सध्या तोळ्यामागे पन्नास हजारांच्या आसपास असले तरी एका तोळ्यामागे सुमारे आठशे रुपये मजुरी, जीएसटी अशी वेगवेगळी आकारणी होत आहे. तरीही मुरबाडमधील सोन्यांच्या दुकानात सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत ग्राहकांची मोठी रिघ पाहायला मिळत आहे. मुरबाडमधील सोन्याच्या दुकानातील गर्दी पाहून सुमारे २५ किलो सोन्याची खरेदी झाल्याची माहिती एका कामगाराने दिली आहे.

गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे कष्टकरी लोकांचे रोजगार हिरावले गेल्याने बाजारातील सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. जे व्यवहार सुरळीतपणे सुरू होते त्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवून खरेदी-विक्री केली जात होती. परंतु मुरबाड शहरातील फक्त सोन्याच्या दुकानात नागरिकांची सोने खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यांचे मुरबाड हे सोने खरेदीचे केंद्र बनल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in