खून करणाऱ्या आरोपीस १२ तासाच्या आत अटक

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन गवारे हे घटनास्थळी पोहचून तातडीने तपासाला सुरुवात केली
खून करणाऱ्या आरोपीस १२ तासाच्या आत अटक

मुरुड पोलीस ठाणे हद्दीत ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास धनगरवाडी ते महलोर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला नागशेट येथील जंगल भागात एका महिलेचे प्रेत अर्धवट स्थितीत जाळले असल्याची माहिती पोलीस पाटील पांडुरंग पानगळे यांनी मुरुड पोलिसांना दिली.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन गवारे हे घटनास्थळी पोहचून तातडीने तपासाला सुरुवात केली. त्वरित डॉग स्कॉड व फिंगर प्रिंट अन्य लोकांना ही बोलावण्यात आले. सदरची महिला अनोळखी असल्याने सुरुवातीला कोणताही धागा सापडत नव्हता.

मुरुड पोलिसांनी अधिक तपास केला असता २१ ऑगस्ट रोजी मांडवा पोलीस ठाण्यात एक महिला हरवल्याची माहिती मिळाली. तातडीने फोटो मागविल्यानंतर सापडलेले प्रेत व सदरची महिला एक असल्याची खात्री पटली.

मुरुड पोलिसांनी वेळ न जाऊ देता मांडवा पोलिसांकडून सर्व माहिती संकलित करून यासंबंधीत एक व्यक्ती संशयित असल्याचे लक्षात येताच संशयित सचिन दिनेश थळे याला ताब्यात घेतले. मयत महिलेचे नाव पूनम विक्रांत पाटील होते. मयत महिला व सचिन थळे यांच्यात प्रेम संबंध होते. काही कारणावरून या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.

आरोपीने मनात राग धरून मयत महिलेस जीवे मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी जंगल भागात मयत महिलेच्या अंगावर लाकडे रचून प्रेत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून सदरील आरोपी सचिन थळे याच्यावर खूनाचा ३०२ व २०१ कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील आरोपीने पोलीस चौकशीत गुन्हा आपणच केल्याचे कबूल केले आहे.

उप विभागीय पोलीस अधिकारी जयदिश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन गवारे एएसआय सचिन वाणी,पोलीस नाईक सुरेश वाघमारे, पोलीस नाईक सागर रोहेकर, पोलीस नाईक विलास आंबेतकर, पोलीस शिपाई सागर रसाळ यांनी आरोपीला पकडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in