उल्हासनगरच्या व्यापाऱ्याची विरारमध्ये गूढ हत्या, कारमध्ये बांधलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

मृतदेह हा उल्हासनगर येथील रहिवाशी आणि विरार पूर्वेच्या चंदनसार येथील एच पी पेट्रोल पंपाचे मालक रामचंद्र काकरानी (वय ७५) यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
उल्हासनगरच्या व्यापाऱ्याची विरारमध्ये गूढ हत्या, कारमध्ये बांधलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
Published on

उल्हासनगर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई फाट्याजवळ सोमवारी दुपारी एक कार उभी असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. जिज्ञासेने त्यांनी कारच्या आत डोकावले असता, गाडीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. ही धक्कादायक घटना समोर येताच, नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा केला असता, मृतदेह हा उल्हासनगर येथील रहिवाशी आणि विरार पूर्वेच्या चंदनसार येथील एच पी पेट्रोल पंपाचे मालक रामचंद्र काकरानी (वय ७५) यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

काकरानी यांच्या खुनाची घटना रविवारी रात्री घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यादिवशी काकरानी नेहमीप्रमाणे आपल्या खासगी कारमधून चालकासोबत विरार येथील त्यांच्या पंपावर गेले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास, त्यांनी व्यवस्थापकाकडून ५० हजार रुपये घेतले आणि घरी जाण्यासाठी निघाले होते. मात्र, त्या रात्री ते घरी पोहोचले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता, त्यांचा मोबाईल नागले गावात सापडला. त्यामुळे नायगाव पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमवारी दुपारी काकरानी यांचा मृतदेह बांधलेल्या अवस्थेत त्यांच्याच कारमध्ये आढळून आला. गळा आवळून त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांचा मृतदेह कारमध्ये सोडून आरोपी पळून गेले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान काकरानी यांचा वाहनचालक मुकेश खुबचंदानी फरार आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके कामाला लागली आहेत. या घटनेने व्यापारी वर्गात संतापाची लाट पसरली आहे.

या हत्येचा तपास अतिशय गहन आहे. आम्ही सर्व संभाव्य शक्यता तपासत आहोत आणि लवकरच आरोपींना पकडण्यात येईल.

- रमेश भामे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक

logo
marathi.freepressjournal.in