नाखवा, खलाशांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा; कोळीबांधवांचा आक्रोश

मुरूड शहरासह एकदरा, राजपुरी व पाच मच्छिमार सोसायटीच्या कोळी बांधव व महिलांनी शेकडोंच्या संख्येने कोटेश्वरी मंदिराजवळ येऊन एलईडी हटाव व आरोपींना तात्काळ अटक करा, यांचा नारा देत आक्रोश व्यक्त करण्यात आला.
नाखवा, खलाशांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा; कोळीबांधवांचा आक्रोश

मुरूड-जंजिरा : मुरूड एकदरा येथील ध्रुव लोदी यांच्या मालकीची कस्तुरी आय एन डी - एम एच/३- एम एम २६८३ या बोटीतील नाखवा व खलाशी खोल समुद्रात मासेमारीकरिता गेले असता, त्याच ठिकाणी एल ई डी मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय लोकांकडून कस्तुरी नौकामधील नाखवा व खलाशांना मारहाण करण्यात आली. ही बातमी मिळताच मुरूड शहरासह एकदरा, राजपुरी व पाच मच्छिमार सोसायटीच्या कोळी बांधव व महिलांनी शेकडोंच्या संख्येने कोटेश्वरी मंदिराजवळ येऊन एलईडी हटाव व आरोपींना तात्काळ अटक करा, यांचा नारा देत आक्रोश व्यक्त करण्यात आला.

यावेळी मोठ्या संख्येने कोळी समाज एकत्र झाला होता. तसेच या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी मुरूड शहरातील मासळी मार्केट बंद ठेवण्यात आले होते. शासनाकडे एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारा भिकेला लागला आहे. धनदांडग्यांची समुद्रात चालणारी जीवघेणी अरेरावी स्थानिक मासेमारी करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण करणारी असून, याबाबींचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी महालक्ष्मी मच्छीमार सोसायटी राजपुरीचे चेअरमन विजय गिदी, हनुमान मच्छिमार सोसायटी एकदराचे चेअरमन पांडुरंग आगरकर, माहेश्वरी विविध कार्यकारी मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित चेअरमन जगन वाघरे, जय भवानी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन प्रकाश सरपाटील, आदींसह शेकडो महिला व कोळी बांधव उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in