नालासोपाऱ्याला सापत्न वागणूक! वसई-विरार पालिकेविरोधात शिवसेना आक्रमक

वसई व विरार शहरांसोबतच नालासोपारा शहराचा परिपूर्ण विकास करण्याच्या दृष्टीने आगामी अंदाजपत्रकात आतापर्यंतच्या अपूर्ण व भविष्यातील आवश्यक विकासकामांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी केली आहे.
नालासोपाऱ्याला सापत्न वागणूक! वसई-विरार पालिकेविरोधात शिवसेना आक्रमक

वसई : वसई-विरार महापालिकेची स्थापना होऊन तब्बल १५ वर्षांचा कालावधी लोटला आहे; पंरतु विकासकामांच्या बाबतीत वसई व विरार शहरांच्या तुलनेत नालासोपारा शहराकडे महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेले आहे. याविरोधात शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वसई व विरार शहरांसोबतच नालासोपारा शहराचा परिपूर्ण विकास करण्याच्या दृष्टीने आगामी अंदाजपत्रकात आतापर्यंतच्या अपूर्ण व भविष्यातील आवश्यक विकासकामांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी केली आहे.

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीच्या ‘अंदाजपत्रका`ची तयार वसई-विरार महापालिका प्रशासनाकडून सुरू झाली आहे. शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने भविष्यातील योजना, आवश्यकता यांची आखणी केली जात आहे. परंतु या अंदाजपत्रकात अनुभव गाठीशी असलेल्या प्रतिष्ठित नागरिकांची मते जाणून घेतल्यास वसई-विरार शहराच्या विकासात मोलाची भर पडू शकेल. या दृष्टीने वसई शिवसेनेने ‘अंदाजपत्रका`त शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांची मते विचारात घ्यावीत, अशी विनंती केली होती. या विनंतीनुसार, ‘सूचना, बदल व संकल्पना` जाणून घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्तांनी बुधवारी, १७ जानेवारी रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. या वेळी वसई-विरार शहरांच्या तुलनेत नालासोपारा शहराकडे पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याकडे जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. दरम्यान, या कामांबाबत शिवसेना प्रचंड आग्रही आहे. त्यामुळे ही कामे येत्या काळात झाली पाहिजेत. अन्यथा; शिवसेना आक्रमक पावित्रा घेईल, असे पंकज देशमुख यांनी या प्रसंगी पालिकेला कळविले आहे.

यंदाच्या अंदाजपत्रकात तरतूद करा

वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेपासून शहरासाठी अनेक योजना आखण्यात आल्या; मात्र त्या आजपर्यंत पूर्णत्वास गेलेल्या नाहीत. यातील बहुतांश योजना-विकासकामे अपूर्णावस्थेत आहेत. महापालिका मुख्यालय, परिवहन भवन, क्रीडा संकुल, अनेक उद्याने यांची कामे जैथे आहेत. सामान्य नागरिकांना साध्या सुविधा मिळतील; अशी कामेही मार्गी लागताना दिसत नाहीत. महापालिका अंदाजपत्रकात दरवर्षी अनेक संकल्पना रंगवून सांगितल्या जातात. पण त्या प्रत्यक्षात येत नाहीत. त्यामुळे किमान या २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात ठोस व सामान्य जनतेच्या दृष्टीने आवश्यक त्या योजनांकरता स्वंतत्र तरतूद करून त्या मुदतीत पूर्ण कशा होतील, यासाठी प्रयत्न केले जायला हवेत, अशी आग्रही मागणी या प्रसंगी जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी केली आहे.

समस्या मरण यातनांपेक्षा वेगळ्या नाहीत

विरार पश्चिमेला महापालिकेच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील ‘स्पोर्टस कॉम्पलेक्स` होऊ घातले आहे. पण नालासोपारा शहरात असलेल्या महापालिकेच्या मैदानांत साधी शौचालयांची सुविधा नाही. वसई-विरार शहरातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण झालेले आहे, पण नालासोपारा शहरात आजही चिंचोळे रस्ते आहेत. हा विकासात्मक विरोधाभास आहे. नालासोपारा शहराला मिळालेली सापत्न वागणूक आहे. याचे परिणाम म्हणून या शहरातील सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दैनंदिन वाहतूककोंडी, पाणी समस्या, कचरा समस्या आता रोजच्या झाल्या आहेत. या समस्या मरण यातनांपेक्षा वेगळ्या नाहीत, अशी खंत जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी या प्रसंगी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in