रविवारी ‘नमो खारघर’ मॅरेथॉन; संपूर्ण महाराष्ट्रात 'नमो चषक' स्पर्धेचे आयोजन

सामाजिक व शारीरिक हित जोपासले जात उत्कृष्ट व सुयोग्य नियोजन आणि वेगवेगळ्या सामाजिक संदेशासाठी प्रसिद्ध असलेल्या या स्पर्धेने लोकप्रियतेची शिखरे गाठली आहेत
रविवारी ‘नमो खारघर’ मॅरेथॉन; संपूर्ण महाराष्ट्रात 'नमो चषक' स्पर्धेचे आयोजन

पनवेल : रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'एक धाव महिला नेतृत्वाखाली विकासासाठी' हे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन 'नमो खारघर मॅरेथॉन २०२४' ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने रविवारी दि. १४ जानेवारी खारघर धावणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात 'नमो चषक' स्पर्धा होणार आहे. त्यानुसार पनवेल विधानसभा क्षेत्रात विविध कला व क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्या अंतर्गत रविवारी(दि. १४) सकाळी ०५ वाजता 'नमो खारघर मॅरेथॉन' तर शनिवारी (दि. १३) खारघर सायकलिंग क्लबच्या सोबतीने सकाळी ७. ३० वाजता 'खारघर सायक्लोथॉन' होणार असून या स्पर्धेला खारघरमधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून सुरुवात होणार आहे.

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या होणाऱ्या मॅरेथॉनला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख तर सन्माननीय उपस्थिती म्हणून आमदार महेश बालदी, प्रवासी संघाचे (एनजीओ) अध्यक्ष तरुण राठी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सेलिब्रिटी जया जुगल परमार यांची उपस्थिती लाभणार आहे. तर सायक्लोथॉनला खारघर सायकलिंग क्लबच्या अँम्बेसिडर राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या स्नेहल माळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सामाजिक व शारीरिक हित जोपासले जात उत्कृष्ट व सुयोग्य नियोजन आणि वेगवेगळ्या सामाजिक संदेशासाठी प्रसिद्ध असलेल्या या स्पर्धेने लोकप्रियतेची शिखरे गाठली आहेत. यंदाची ही स्पर्धा १४ वी असून स्पर्धा पुरुष खुला गट १० किलोमीटर अंतर, महिला खुला गट १० किलोमीटर अंतर, १७ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १७ वर्षाखालील मुली गट ०५ किलोमीटर, १४ वर्षाखालील मुले गट ०५ किमी अंतर, १४ वर्षाखालील मुली गट ०५ किमी अंतर, तसेच खारघर दौड गट ०३ किलोमीटर आणि सिनिअर सिटीझन दौड ०२ किलोमीटर अशा आठ गटात ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. या स्पर्धेचा क्रीडारसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे चेअरमन परेश ठाकूर, जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख, खारघर भाजपचे अध्यक्ष प्रवीण पाटील, खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमर उपाध्याय, चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in