आषाढीवारीची दिंडी सर्वदूर दिसू लागली आहे. असे असले तरी कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या वेगळ्याच दिंडीची चर्चा सुरु आहे. कल्याण-डोंबिवली म्हंटलं की, सांस्कृतिक नगरी अशी ओळखच पहिली डोळ्यासमोर येते. अशातच आता फ्रेमफायर स्टुडिओ निर्मित, स्वामी नाटयांगण दोन अफलातून नाट्यप्रयोगाची नाट्यदिंडी सादर करत आहेत.
मुळात कल्याण डोंबिवलीमध्ये नाटक बघणारा एक विशेष वर्ग आहे, अशात आता एका तिकिटामध्ये म्हणजेच फक्त १०० रुपयामध्ये २ चांगले प्रयोग बघायला मिळणार असल्याने सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. द. मा. मीराजदार यांच्या कथेवर आधारित अभिषेक गावकर लिखित ‘भगदाड‘ ही अनेक ठिकाणी अव्वलस्थान पटकावलेली एकांकिका प्रयोग या दिंडीमध्ये सादर होणार आहे.
या एकांकिकेचे दिग्दर्शन यश नवले यांनी केले आहे. तसेच, खास प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ‘नवरा आला वेशीपाशी‘ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे, याचे लिखाण व दिग्दर्शन यश नवले आणि राजरत्न भोजने यांनी संयुक्तपणे केले आहे.