पुण्यापाठोपाठ ठाण्यातही महायुती तुटली? अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा इशारा

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढवण्यात येणार असल्याची घोषणा भाजप व शिंदे सेनेकडून करण्यात येत आहे. तरीही ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार गटाने वेगळी वाट धरली आहे. याबाबत ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे. यामुळे ठाण्यात अजित पवार गट महायुतीपासून अलिप्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यापाठोपाठ ठाण्यातही महायुती तुटली! अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार
पुण्यापाठोपाठ ठाण्यातही महायुती तुटली! अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार
Published on

ठाणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढवण्यात येणार असल्याची घोषणा भाजप व शिंदे सेनेकडून करण्यात येत आहे. तरीही ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार गटाने वेगळी वाट धरली आहे. याबाबत ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे. यामुळे पुण्यापाठोपाठ ठाण्यातही अजित पवार गट महायुतीपासून अलिप्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मतांचे धुव्रीकरण रोखण्यासाठीच ही खेळी असल्याची चर्चा आता ठाण्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राज्यात भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट यांची महायुती सत्तेवर आहे. या तिन्ही पक्षांनी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत महायुतीने सत्ता स्थापन केली. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांतील मतभेद उघड झाले होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत न लढवता स्वतंत्रपणे लढाव्यात, अशी भूमिका अनेक कार्यकर्त्यांकडून मांडली जात होती. दोन दिवसांपूर्वी भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांनी स्थानिक निवडणुकाही महायुतीतच लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता.

ठाणे महापालिका निवडणूक महायुतीतच लढवण्यात येईल, असा दावा भाजप व शिंदे सेनेकडून केला जात असताना अजित पवार गटाची अद्याप भूमिका मात्र अस्पष्ट होती. या पार्श्वभूमीवर नजीब मुल्ला यांनी ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय स्पष्ट केला. आम्ही महायुतीचा घटक पक्ष आहोत, मात्र ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप किंवा शिंदे सेनेसोबत युती करणार नाही. ही भूमिका आम्ही वरिष्ठ नेत्यांना कळवली असल्याचेही मुल्ला यांनी स्पष्ट केले आहे.

कळवा, मुंब्य्रात विधानसभेचे अपयश लक्षात घेता, अजित पवार गटाला महायुतीत लढल्याने मुस्लिम मतांचे विभाजन होऊ नये किंबहुना मतांचे धुव्रीकरण रोखण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला का? अशी चर्चा या निमित्ताने केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in