
उल्हासनगर : उल्हासनगरच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने मोठी राजकीय चाल खेळत भरत गंगोत्री यांना पुन्हा एकदा शहराध्यक्षपदी नियुक्त केले आहे. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, कलानी गटाशी संभाव्य समीकरणांवर पडदा पडला आहे. राष्ट्रवादीने स्पष्टपणे 'गंगोत्री फॉर्म्युला'वर विश्वास दाखवला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत गंगोत्री यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतर तब्बल वर्षभर शहराध्यक्षपद रिक्त होते. दरम्यान, राष्ट्रवादी हा महत्त्वाचा पदभार कलानी गटाला देण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु कलानी गटाने शिवसेनेसोबत केलेल्या मैत्री गठबंधनामुळे तो पर्याय बाद झाला. भरत गंगोत्रींच्या पुनर्नियुक्तीने सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज आहोत. लवकरच शहर कार्यकारिणीची बैठक घेऊन पुढील रणनीती जाहीर करण्यात येईल.
भरत गंगोत्री, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नेमके कोणासोबत युती करणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी गंगोत्रींच्या पुनर्नियुक्तीमुळे संघटनेला नवचैतन्य मिळाले आहे. हा निर्णय स्थानिक राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम करणारा ठरेल, असा राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गंगोत्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताच राकाँपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.