महिला तक्रार निवारण केंद्रासाठी राष्ट्रवादी लागली कामाला

कौटुंबिक हिंसाचार तसेच महिलांशी संबंधित तक्रारींचा लवकरात लवकर निपटारा करून त्यांना न्याय मिळावा
महिला तक्रार निवारण केंद्रासाठी राष्ट्रवादी लागली कामाला

बदलापूर : बदलापूरच्या पोलीस ठाण्यातील महिला तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीने (अजित पवार गट) हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने सहपोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले असून त्यांनीही या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

कौटुंबिक हिंसाचार तसेच महिलांशी संबंधित तक्रारींचा लवकरात लवकर निपटारा करून त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने बदलापूरच्या पोलीस ठाण्यात महिला तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यामुळे बदलापूर परिसरातील महिलांसाठी ते सोयीचे ठरत होते; मात्र गेल्या काही वर्षांपासून महिला तक्रार निवारण केंद्र बंद करण्यात आल्याने महिलांना आता उल्हासनगर येथील तक्रार निवारण केंद्रात जावे लागत आहे. त्यामुळे महिलांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता बदलापुरातील तक्रार निवारण केंद्र पुन्हा सुरू व्हावे, अशी मागणी महिलावर्गाकडून होत आहे. या मागणीची दखल घेऊन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रियांका दामले यांनी महिला तक्रार निवारण केंद्र पुन्हा सुरू व्हावे, अशी विनंती राज्याच्या महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांना केली होती. राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्याच्या निमित्ताने बदलापुरात आलेल्या आदिती तटकरे यांनीही शहरात महिला तक्रार निवारण केंद्र असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते.

तसेच यासंदर्भात प्रस्ताव आल्यास तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासनही दिले होते. त्यानंतर दोनच दिवसांत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने प्रियांका दामले यांनी सह पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांची भेट घेऊन लवकरात लवकर महिला तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. यावर सहपोलीस आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने लवकरात लवकर बदलापुरात महिला तक्रार निवारण केंद्र सुरू होईल, असा विश्वास प्रियांका दामले यांनी व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in