ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसंघटनेची पुनर्रचना; सर्व समित्या बरखास्त, पक्षबांधणीला जोमाने सुरुवात

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षसंघटनेची पुनर्रचना करण्यात येणार असून शहरासह महिला, युवा आणि इतर सर्व समित्या बरखास्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसंघटनेची पुनर्रचना; सर्व समित्या बरखास्त, पक्षबांधणीला जोमाने सुरुवात
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसंघटनेची पुनर्रचना; सर्व समित्या बरखास्त, पक्षबांधणीला जोमाने सुरुवात
Published on

ठाणे : ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षसंघटनेची पुनर्रचना करण्यात येणार असून शहरासह महिला, युवा आणि इतर सर्व समित्या बरखास्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाला नव्याने बळकटी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अलीकडेच झालेल्या बैठकीत स्थानिक पक्ष नेतृत्वाने सर्व समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. तसेच पक्ष सोडून इतरत्र जाण्याची इच्छा असलेल्या पदाधिकाऱ्यांना कोणतीही अडचण न आणता वाट मोकळी करून देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

पुढील काळात नव्याने संघटनात्मक रचना जाहीर केली जाणार असल्याने नव्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी पक्षाचे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाला मोठा धक्का बसला असून संघटनात्मक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्याच्या चर्चांनाही काहीसा विराम लागल्याने स्थानिक पदाधिकारी द्विधा मनःस्थितीत असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत पक्षाच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी, ज्यांना पक्ष सोडून इतरत्र जायचे असेल त्यांनी निसंकोचपणे जावे; त्यांना अडवले जाणार नाही. सध्या पक्षाकडे देण्यासाठी बरेच काही नसले तरी सोबत राहणाऱ्यांना सांभाळून घेतले जाईल, असे सांगितल्याची माहिती मिळाली आहे. बैठकीनंतर युवा, महिला आणि इतर सर्व समित्या बरखास्त करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

जुन्या पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या

आता पक्षसंघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी नव्याने रचना केली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. नव्याने गठित होणाऱ्या समित्यांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. तसेच काही जुन्या पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या सोपविण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

logo
marathi.freepressjournal.in