'जनतेचे ऐकू नका पण या गाढवाचे तर ऐका...', भाजपविरोधात राष्ट्रवादीचा 'गाढव मोर्चा'

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून होणाऱ्या चौकशीच्या विरोधात मीरा-भाईंदर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला.
'जनतेचे ऐकू नका पण या गाढवाचे तर ऐका...', भाजपविरोधात राष्ट्रवादीचा 'गाढव मोर्चा'

भाईंंदर : मीरा-भाईंदरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सध्या महाविकास आघाडीतील प्रमुख नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून सातत्याने सूडबुद्धीची कारवाई सुरू असून त्यात दोषी असणाऱ्या व भाजपमधील तसेच भ्रष्टाचाराचे आरोप करून मग भाजपमध्ये गेलेल्यांना मात्र संरक्षण दिले जात आहे, असा आरोप करत शरद पवारांची राष्ट्रवादी काँगेस पक्षाने गाढव मोर्चा काढून भाजप व सरकारचा तसेच ईडीचा निषेध व्यक्त करण्यात आला. जनतेचे ऐकू नका पण या गाढवाचे तर ऐका म्हणत घोषणा देण्यात आल्या व त्याचे निवेदन अप्पर तहसीलदार निलेश गौंड यांना देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून होणाऱ्या चौकशीच्या विरोधात मीरा-भाईंदर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असून एक गट सरकारमध्ये सामील झाला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जाते, असा आरोप केला जात आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे न डगमगता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाची भूमिका ठामपणे आणि मुद्देसूदपणे मांडत आहेत.

सरकारविरोधात आवाज उठवत असल्यामुळे घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लावला आहे. त्यांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड. विक्रम तरे पाटील, महाराष्ट्र प्रदेश सचिव अंकुश मालुसरे, जिल्हा कार्याध्यक्ष गुलाम नबी फारुखी, महिला जिल्हा अध्यक्ष वनजारानी नायडू, मनोज कोतवाल, आशा शिंदे , नवाज गैबी जिल्हा उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकांचे प्रश्न विचारणाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास

आमदार रोहित पवार यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. इतर अनेक नेत्यांचा या प्रकरणाशी संबंध असताना ते भाजपमध्ये असल्यामुळे त्यांची चौकशी केली जात नाही. केवळ त्रास देण्याच्या हेतूनेच या सरकारकडून आमदार रोहित पवार यांची चौकशी करत असून लोकांचे प्रश्न विचारणाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे या आंदोलकांचे म्हणणे आहे. याविरोधातच हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी आक्रमकपणे सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in