नेरळ-माथेरान ऐतिहासिक मिनी ट्रेन पुन्हा धावणार! १ नोव्हेंबरपासून सेवा सुरू होण्याची शक्यता

माथेरानच्या पर्यटन अर्थव्यवस्थेसाठी ही मिनी ट्रेन सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पावसाळ्यानंतर रखडलेल्या दुरुस्तीमुळे अनेक पर्यटकांना निराशा सहन करावी लागली होती.
नेरळ-माथेरान ऐतिहासिक मिनी ट्रेन पुन्हा धावणार! | संग्रहित छायाचित्र
नेरळ-माथेरान ऐतिहासिक मिनी ट्रेन पुन्हा धावणार! | संग्रहित छायाचित्र
Published on

माथेरान : नेरळ-माथेरान या ऐतिहासिक मिनी ट्रेन मार्गावर पुन्हा एकदा रेल्वेची चाके धावणार आहेत. सामाजिक कार्यकर्ता जनार्दन शंकर पारटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासनाने घाटातील रुळांच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण करण्यात आली आहेत. येत्या काही दिवसांत मध्य रेल्वेच्या सेफ्टी ऑफिसर यांच्या उपस्थितीत ट्रायल रन होणार असून, सर्व अहवाल समाधानकारक मिळाल्यास १ नोव्हेंबरपासून नियमित ट्रेन सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

माथेरानच्या पर्यटन अर्थव्यवस्थेसाठी ही मिनी ट्रेन सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पावसाळ्यानंतर रखडलेल्या दुरुस्तीमुळे अनेक पर्यटकांना निराशा सहन करावी लागली होती.

या पार्श्वभूमीवर पारटे यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना यांना निवेदन देऊन दुरुस्ती व सुरक्षा कामांना गती देण्याची मागणी केली होती.

तसेच सध्या दररोज फक्त दोनच ट्रेन धावत असल्याने गर्दी वाढते. त्यामुळे सकाळी तीन आणि संध्याकाळी एक अशा चार ट्रेन चालविण्याची मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. रेल्वेने या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत ट्रॅक दुरुस्तीचे काम पूर्णत्वास नेले असून, ट्रायल रननंतर मार्ग पुन्हा खुला करण्यात येणार आहे.

माथेरानकर आणि पर्यटकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, या मिनी ट्रेनमुळे माथेरानचे पर्यटन पुन्हा गती घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रवासी डबा वाढविण्याची मागणी

निवेदनात पारटे यांनी नेरळ-माथेरान घाटातील २१ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाची संपूर्ण देखभाल पूर्ण व्हावी, तसेच प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करावी, अशी मागणी केली होती. सध्या या ट्रेनमध्ये १ फर्स्ट क्लास (१५ सिटर), ३ सेकंड क्लास (३० सिटर) आणि २ लगेज कोच (१० सिटर) मिळून एकूण ११५ आसनांची व्यवस्था आहे. प्रवासी संख्येचा विचार करता, एक मालवाहतूक डबा कमी करून त्याऐवजी एक प्रवासी डबा वाढवावा, अशी मागणीही पारटे यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in