

बदलापूर : गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असली, तरी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला नाही. मात्र, बदलापूरमधील चौपाटीजवळ उल्हास नदीवर उभारण्यात आलेल्या नव्या पुलाच्या प्रवेशद्वारावर पुन्हा एकदा पुराचे पाणी साचल्याने पुलाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या काळात शेजारील जुना पूल वाहतुकीसाठी सुरळीत सुरू राहिल्याने नव्या पुलाच्या उपयुक्ततेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बदलापूर शहराला बदलापूर गाव, अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यातील गावांशी जोडण्यासाठी जुन्या पुलालगत दोन वर्षांपूर्वी नव्या पुलाची उभारणी करण्यात आली होती. नदीला पूर आल्यासही वाहतूक अखंड सुरू राहावी, हा या पुलाचा मुख्य उद्देश होता.
अनेक प्रश्न अनुत्तरित
पुलाचे नियोजन करताना उल्हास नदीच्या पुराच्या पातळीचा पुरेसा अभ्यास करण्यात आला होता का, बदलापूरच्या बाजूने पुलाची लांबी वाढविली असती तर प्रवेशद्वारावर पाणी साचण्याची समस्या टळली असती का, तसेच कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेला पूल पुराच्या काळातच बंद ठेवावा लागत असेल, तर या प्रकल्पाचा उद्देश कितपत सफल झाला, असे अनेक प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.