पालिकेचे पाणी बांधकामांना वापरता येणार नाही; नवीन इमारतीला परवानगी देताना ठाणे महापालिकेचे धोरण

पाणी वितरण व्यवस्थाही सुधारण्यासाठी प्रयन्त करण्यात येणार अशा प्रकारच्या धोरणांमुळे पाण्याची बचत होण्यास मदत होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका क्षेत्रात आणि विशेष करून घोडबंदर पट्ट्यात भविष्यात पाण्याची गरज ही दुप्पट होणार आहे.
पालिकेचे पाणी बांधकामांना वापरता येणार नाही; नवीन इमारतीला परवानगी देताना ठाणे महापालिकेचे धोरण
Published on

ठाणे : भविष्यात नवीन बांधकामांना परवानगी देताना भूजल किंवा महापालिकेचे पाणी वापरता येणार नसून, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. इतर कामांसाठी वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी एसटीपी प्लांटवर टँकर फिलिंग पॉइंट तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

पाणी वितरण व्यवस्थाही सुधारण्यासाठी प्रयन्त करण्यात येणार अशा प्रकारच्या धोरणांमुळे पाण्याची बचत होण्यास मदत होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका क्षेत्रात आणि विशेष करून घोडबंदर पट्ट्यात भविष्यात पाण्याची गरज ही दुप्पट होणार आहे. ठाणे महापालिकेला हक्काचे धरण नसल्याने आजही महापालिकेला इतर स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. ठाणे शहराला सध्या बृहन्मुंबई महापालिका, एमआयडीसी, स्टेम आणि ठाणे महापालिकेची स्वतःची योजना असा मिळून दररोज ५८२ एमएलडी पाणी उपलब्ध होते.

भविष्यातील पाण्याची गरज पाहता ही पाणी अतिशय अपुरे पडणार आहे. यातील दररोज ३२६ एमएलडी सांडपाण्यावर सेकंडरी ट्रीटमेंट करून हे पाणी खाडीत सोडले जाते. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी नवीन धोरण निश्चित केले असून, यापुढे इमारतीला परवानगी देताना भूजल किंवा ठाणे महापालिकेच्या पाण्याचा वापर न करता वापरलेल्या पाण्याचा वापर करणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

तूर्तास पाणीटंचाई नाही

ठाण्यातील काही भागात काही प्रमाणात पाणीटंचाई जाणवू लागली असली तरी किमान एक ते दीड महिना पाणी कपात होणार नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. पाणी वितरण व्यवस्था सुधारण्याबरोबरच पाण्याची बचत आणि काटकसर यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्याचप्रमाणे दिव्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in