तुम्हीच सांगा आम्ही शिकायचे तरी कसे? ना वर्गखोल्या ना शिक्षक; डहाणू तालुक्यातील शेणसरी वरठापाडा येथील प्रकार

आजतागायत या शाळेच्या इमारतीसाठी मंजुरी मिळालेली नाही. परिणामी येथे शिकणाऱ्या १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेलगत असलेल्या घराच्या ओट्यावर बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.
तुम्हीच सांगा आम्ही शिकायचे तरी कसे? ना वर्गखोल्या ना शिक्षक; डहाणू तालुक्यातील शेणसरी वरठापाडा येथील प्रकार

नितीन बोंबाडे /पालघर

डहाणू तालुक्यातील शेणसरी वरठापाडा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत सन २००८ - ०९ या वर्षात बांधण्यात आली होती. आज ही इमारत जीर्ण झालेल्या अवस्थेत उभी आहे. ना दुरुस्ती ना डागडुजी त्यामुळे इमारत धोकादायक बनली आहे. शासनस्तरावर नवीन इमारतीसाठी प्रस्ताव पाठविल्याचे सरपंच व गट शिक्षण अधिकारी सांगतात; मात्र आजतागायत या शाळेच्या इमारतीसाठी मंजुरी मिळालेली नाही. परिणामी येथे शिकणाऱ्या १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेलगत असलेल्या घराच्या ओट्यावर बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. उघड्यावर शाळा भरत असल्याने थंडी आणि वाऱ्याचा त्रास सोसत विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. एकीकडे ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत सारे शिकूया पुढे जाऊया, असे घोषवाक्य देत शासन शिक्षणावर करोडो रुपयांचा खर्च करीत असल्याचे दाखवले जात आहे; मात्र प्रत्यक्षात ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळीच पहावयास मिळत आहे.

शाळेलगत असलेल्या घराच्या ओट्यावर जिथं ही शाळा भरते तिथेच किराणा दुकान आहे. त्यामुळे ग्राहकांची वर्दळ सुरू असताना विद्यार्थी एकाग्रपणे शिक्षण घेणार तरी कसे? अश्या बिकट परिस्थितीतही आदिवासी विद्यार्थी जिद्दीने शिक्षण घेण्यास इच्छुक असताना या शाळेवर नियुक्त असलेल्या शिक्षिकेने चक्क शेणसरी ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यास रोजंदारी शिक्षिका नेमून स्वतः मात्र शाळेवर येतच नसल्याची बाब ग्रामस्थांकडे अधिक चौकशी केल्यानंतर समोर आली आहे. त्यामुळे ना वर्गखोल्या ना शिक्षक साहेब तुम्हीच सांगा आम्ही शिकायचे तरी कसे? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. शेणसरी वरठापाडा या शाळेवरील शिक्षिका गैरहजर राहत असल्याच्या प्रकाराबाबत बांधघर केंद्र प्रमुखांना विचारले असता, मी काही दिवसांपूर्वीच प्रभारी केंद्र प्रमुखाचा पदभार स्वीकारला आहे. असे सांगत प्रभारी केंद्र प्रमुखांना शाळेवर भेटी देण्याचे अधिकार दिलेले नाहीत. आम्ही फक्त महिन्याकाठी सांख्यिकी माहिती शिक्षण विभागाकडे पाठवित असतो. मी प्रत्यक्षात या शाळेवर आजपर्यंत कधीही भेट दिलेली नाही. त्यामुळे तेथील परिस्थिती काय आहे हे मला माहीत नाही, असे केंद्र प्रमुखांचे म्हणणे आहे. त्यामुळे केंद्रांना कायमस्वरूपी केंद्र प्रमुखांची गरज आहे. जेणकरून केंद्रप्रमुख त्यांच्या केंद्रातील शाळांवर भेटी देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतील व दांडी बहाद्दर शिक्षकांवर वचक राहील; मात्र शिक्षण विभागच याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून त्यांचा कारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे.

शेणसरी, कोसेसरी, भवाडी ही गावे डहाणू पंचायत समिती पासून सुमारे ६० कि.मी. अंतरावर आहेत. या ठिकाणचे रस्ते उखडलेले असून त्यांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे या भागात अधिकारी ही फिरकत नसल्याने काही शिक्षक मनमानी पद्धतीने वागत असल्याचे चित्र आहे. मात्र अश्या ठराविक दांडी बहाद्दर व लेटलतिफ शिक्षकांमुळे ग्रामीण भागात असलेल्या परिस्थितीत विविध उपक्रम राबवून दर्जेदार शिक्षण देणारे शिक्षकही नाहक बदनाम होत आहेत.

'सारे शिकूया पुढे जाऊया' फक्त फलकावर दाखविण्यापुरते

आदिवासी गाव पाड्यातील मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत; मात्र या शाळांचीही दुरवस्था झालेली पाहायला मिळते. बांधघर केंद्रातील धरमपुर कोलातपाडा शाळेत जून महिन्यापासून शिक्षकच नाहीत ही शून्य शिक्षकी शाळा आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे; मात्र या शाळेवर डहाणू पंचायत समितीचा शिक्षण विभाग आजतागायत कायमस्वरूपी शिक्षक देऊ शकलेला नाही. ग्रामीण भागात शिक्षक नसल्याची ओरड नेहमीच केली जात आहे; मात्र पालघर हा आदिवासी जिल्हा असूनही काही बिगर आदिवासी संघटनांनी पेसा शिक्षक भरतीला विरोध केल्याने शिक्षक भरती होऊ शकली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही शिक्षणापासून वंचित राहत आहेत. एकूणच ही परिस्थिती बघता 'सारे शिकूया पुढे जाऊया' हे वाक्य फक्त फलकावर दाखविण्यापुरतेच आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शेणसरी वरठापाडा जि. प. शाळेच्या नवीन इमारत बांधणीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच गैरहजर शिक्षेकेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.

- माधवी तांडेल, गटशिक्षण अधिकारी, डहाणू पंचायत समिती

शाळेच्या इमारती अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, थंडीत घराच्या ओट्यावर बसावे लागत आहे. त्यामुळे या शाळेच्या इमारतीस लवकरात लवकर मंजुरी देऊन इमारत बांधून मिळावी. - साधना बोरसा, सरपंच, शेणसरी ग्रामपंचायत

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in