भिवंडीत बाहेरील जड-अवजड वाहनांना बंदी; गुढीपाडव्यापासून शहरात अधिसूचना लागू

वंडी शहरातून वाडा, नाशिक, मुंबई, अंजूरफाटाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना भिवंडी शहरात प्रवेश करण्यास...
भिवंडीत बाहेरील जड-अवजड वाहनांना बंदी; गुढीपाडव्यापासून शहरात अधिसूचना लागू

भिवंडी : भिवंडी शहरातून वाडा, नाशिक, मुंबई, अंजूरफाटाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना भिवंडी शहरात प्रवेश करण्यास २४ तास बंदी करण्यात आली असून गुजरातला जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांनी वाडामार्गे जाण्यासाठी वंजारपट्टी नाका उड्डाणपुलावरून जाण्यासाठी अधिसूचना ठाणे शहर वाहतूक विभागामार्फत काढण्यात आली आहे. त्यामुळे शहराबाहेरील जड वाहनांमुळे शहरात होणारे अपघात नियंत्रित होणार आहेत.

गुढीपाडव्यापासून ही अधिसूचना लागू करण्यात आली आहे. भिवंडी शहर हे मुंबई महानगर प्रदेशाचे प्रवेशद्वार असल्याने गुजरातकडून मुंबईकडे व मुंबईकडून परत गुजरातकडे त्याचप्रमाणे गुजरातकडून नाशिककडे व नाशिककडून गुजरातकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांची भिवंडी शहरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून सदर वाहतूक संक्रमण प्रकारची आहे. भिवंडी शहरामध्ये मोठा वस्त्रोद्योग असल्याने त्याच्याशी पुरक यंत्रमाग, डाईंग, सायझींग असे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच शहरामध्ये प्लास्टिक मोती बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच भिवंडी हे लॉजिस्टीक पार्कने हब म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या शहरातून मोठ्या प्रमाणात जड-अवजड मालवाहू वाहनांची वाहतूक सतत सुरू असते.

सदर वाहतूक भिवंडी शहरातून सुरू होणारी व संपणारी या प्रकारची असते. शहरातील माल वाहतुकीच्या वाहनांच्या मार्गावर शासकीय कार्यालये, न्यायालय, उपजिल्हा रुग्णालय, बाजारपेठा, बँका, दवाखाने, शाळा, महाविद्यालय असून शासकीय कर्मचारी, दैनंदिन व्यवहाराकरिता येणारे जाणारे नागरिक, दवाखान्यात दवाउपचाराकरीता येणारे रुग्ण तसेच महाविद्यालयात येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी असते. त्यामुळे सदर मार्गावर वाहतूककोंडी होवून सामान्य नागरिकांना मनस्ताप व असुविधा होते. तसेच या व्यवसायिक वाहनांमुळे छोटे-मोठे अपघात, प्राणांतिक अपघात तसेच जीवितहानी सुद्धा झालेली आहे.

त्यामुळे भिवंडी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच या मार्गावर नेहमी वाहतूककोंडी होते. या परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून जनतेच्या सोईसाठी ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी अधिसूचना जारी केली आहे.

नागरिकांच्या मागणीवर वाहतूक पोलिसांचा निर्णय

भिवंडी महानगराची लोकसंख्या सुमारे १० लाखापर्यंत पोहोचलेली असून ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या अभिलेखानुसार २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत भिवंडी शहरात सर्व प्रकारची वाहने मिळून ३,९९,६८३ वाहनांची नोंद करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त भिवंडी शहर औद्योगिक शहर असल्याने येथे बाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे शहरातून होणारी जड-अवजड वाहनांना शहरातून वाहतूक करण्यास बंदी करावी, यासाठी लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी सरकारकडे मागणी केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in