धाकटी डहाणू गावात राजकीय पक्षांना नो एंट्री; गावात बॅनर लावून राजकीय पक्षांना इशारा

लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच घाकटी डहाणू येथील मच्छीमारांनी सर्व राजकीय नेत्यांना धाकटी डहाणू गावात प्रवेश बंदी असे बॅनर सर्वत्र लावल्याने डहाणू येथील राजकीय पक्षात खळबळ उडाली आहे.
धाकटी डहाणू गावात राजकीय पक्षांना नो एंट्री; गावात बॅनर लावून राजकीय पक्षांना इशारा

पालघर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पालघर जिल्ह्यात होऊ घातलेल्या वाढवण बंदराविरोधाचे पडसाद किनारपट्टीच्या गावामध्ये उमटले असून जोपर्यंत वाढवण बंदर कायमचे रद्द होत नाही, तोपर्यंत कोणताही राजकीय पक्ष व नेत्यास गावात प्रवेश दिला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका डहाणूतील मच्छीमारांनी घेतली असून वाढवण बंदर रद्द करा, अशी गगनभेदी घोषणाबाजी करून शेकडो मच्छीमारांनी गावांत तसेच घाकटी डहाणूच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठमोठे बॅनर लावून राजकीय पक्षांना इशारा दिला आहे.

डहाणू येथील मच्छीमार शेतकरी बागायतदार तसेच डायमेकर यांना उद्ध्वस्त करणाऱ्या वाढवण बंदराला विरोध केला जात आहे. वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षापासून मोर्चे, गावबंद आंदोलन, रास्ता रोको, उपोषण इत्यादी आंदोलन करून शासनाबरोबर लढा देत आहे. वाढवण बंदरामुळे या परिसरातील पारंपारिक पद्धतीने मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमारांवर उपासमारीची पाळी येणार आहे. त्यामुळे वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी हजारो मच्छीमार रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. विशेष म्हणजे वाढवण बंदरविरोधात भूमिपुत्र आंदोलन करीत असताना केवल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाने वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीला पाठिंबा न दिल्याने येथील भूमिपुत्रात राजकीय पक्षाविरोधात प्रचंड नाराजी (रोष) आहे.

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच घाकटी डहाणू येथील मच्छीमारांनी सर्व राजकीय नेत्यांना धाकटी डहाणू गावात प्रवेश बंदी असे बॅनर सर्वत्र लावल्याने डहाणू येथील राजकीय पक्षात खळबळ उडाली आहे. या बॅनरवर 'आपली मानमर्यादा राखून गावात प्रवेश करावा. तसेच गावात प्रवेश केल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास ते स्वतः जबाबदार राहतील,' असे येथील ग्रामस्थांनी ठणकावून राजकीय पक्षांना इशारा दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in