स्मशानभूमीला रस्ता मिळणार कधी? मृत्यूनंतरही छळ संपणार की नाही?; नडगावच्या संतप्त ग्रामस्थांचा सवाल

शहापूर तालुक्यातील नडगावच्या पूर्वेला असलेल्या स्मशानभूमीला गेल्या अनेक वर्षांपासून रस्ताच नाही. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी प्रेताची त्याचप्रमाणे दु:खी कुटुंब, आप्तेष्ट व ग्रामस्थांची प्रचंड अवहेलना होत असते.
स्मशानभूमीला रस्ता मिळणार कधी? मृत्यूनंतरही छळ संपणार की नाही?; नडगावच्या संतप्त ग्रामस्थांचा सवाल
Published on

शहापूर : शहापूर तालुक्यातील नडगावच्या पूर्वेला असलेल्या स्मशानभूमीला गेल्या अनेक वर्षांपासून रस्ताच नाही. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी प्रेताची त्याचप्रमाणे दु:खी कुटुंब, आप्तेष्ट व ग्रामस्थांची प्रचंड अवहेलना होत असते. या संदर्भात येथील जागरूक ग्रामस्थ सनी संगारे यांनी अनेक वेळा ग्रामपंचायतकडे तक्रार केली होती. परंतु ग्रामपंचायतीने त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

सनी संगारे यांच्या म्हणण्यानुसार, साधारणपणे २०२१-२२ या कालावधी दरम्यान अंदाजे रक्कम १० लाख रुपयांपर्यंतचा जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमी दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. त्या रक्कमेतून स्मशानभूमी बांधण्यात ही आली. परंतु अनेक वर्ष स्मशानभूमीपर्यंत जाण्याचा रस्ता तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीला शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचा विसर पडलेला आहे की काय?असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

उन्हाळा असल्याने सध्या पायवाटेने प्रेत कसेबसे स्मशानभूमीकडे नेता येते; पावसाळ्यात मात्र येथील नागरिकांची फारच त्रेधातिरपीट उडते. गेल्या पावसाळ्यात मयत जानू संगारे, राहुल संगारे व नंदकुमार शिंदे यांच्या प्रेतयात्रा अक्षरशः गुडघाभर चिखलातून स्मशानभूमीपर्यंत न्याव्या लागल्या होत्या. वृद्ध व्यक्ती तसेच महिलांना चिखलातून वाट काढणे अत्यंत जिकिरीचे होऊन गेले होते. अशातच यंदाही अशीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून लवकरात - लवकर रस्ता तयार करून देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली असल्याची माहिती सनी संगारे यांनी दिली आहे. या संदर्भात नडगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक भरत डिंगोरे यांच्याशी दोनदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

logo
marathi.freepressjournal.in