डोंबिवली : आगामी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुषमा अंधारे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मतदारसंघातून प्रथमच महिला उमेदवार दिली जाईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. गेली दहा वर्षे या मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने जिंकले आहेत. आता शिवसेना आणि भाजप महायुतीतून त्यांनाच उमेदवार दिली जाणार आहे, तर महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुषमा अंधारे यांना उमेदवारी मिळावी, याकरिता शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.
उमेदवाराला तोडीस तोड असा चेहरा
याबाबत डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर म्हणाले, कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी मागणी केली असली तेही त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील. आदित्य ठाकरे यांची या मतदारसंघात उमेदवारी दिली जाईल, अशी जी चर्चा आहे त्यात तथ्य नाही. या मतदारसंघातून समोरच्या उमेदवाराला तोडीस तोड, असा चेहरा म्हणजे सुषमा अंधारे असाव्यात, आमची मागणी आहे.