महापालिका निवडणुकांत ‘नोटा’ चा राजकीय इशारा! ठाणेकरांमध्ये असंतोष; उल्हासनगरमध्ये नाराजीचा स्फोट

राजकीय फोडाफोडी, सत्तासंघर्ष, पक्षांतरांचे राजकारण आणि मतदारांशी तुटलेला संवाद याविरोधात यंदाच्या महापालिका निवडणुकांत मतदारांनी थेट भूमिका घेतली आहे. ठाणे आणि उल्हासनगर या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये मतदारांनी उमेदवारांऐवजी ‘नोटा’ला कौल देत संपूर्ण राजकीय व्यवस्थेलाच इशारा दिला आहे.
महापालिका निवडणुकांत ‘नोटा’ चा राजकीय इशारा!
महापालिका निवडणुकांत ‘नोटा’ चा राजकीय इशारा!
Published on

ठाणे / उल्हासनगर : राजकीय फोडाफोडी, सत्तासंघर्ष, पक्षांतरांचे राजकारण आणि मतदारांशी तुटलेला संवाद याविरोधात यंदाच्या महापालिका निवडणुकांत मतदारांनी थेट भूमिका घेतली आहे. ठाणे आणि उल्हासनगर या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये मतदारांनी उमेदवारांऐवजी ‘नोटा’ला कौल देत संपूर्ण राजकीय व्यवस्थेलाच इशारा दिला आहे. विजयाचे दावे, सत्तेचे गणित आणि आकड्यांचा जल्लोष सुरू असतानाच, मतपेटीतून उमटलेला हा असंतोषाचा आवाज धोक्याची घंटा ठरत आहे.

ठाणेकरांमध्ये असंतोष

ठाणे महापालिका निवडणुकांच्या रणांगणात यंदा विजय-पराजयाइतकाच मतदारांचा असंतोष ठळकपणे समोर आला आहे. ठाणे आणि उल्हासनगर या दोन्ही शहरांमध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात ‘नोटा’चा पर्याय निवडत राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना थेट आरसा दाखवला आहे. ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ६४९ उमेदवार रिंगणात होते. मात्र यापैकी कोणताही उमेदवार पसंत नसल्याचे सांगत १ लाख २५ हजारांहून अधिक मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला.

२०१७ मध्ये ५८.८ टक्के मतदान झाले होते, तर यंदा ही टक्केवारी ५५.५९ टक्क्यांपर्यंत घसरली. मतदानातील घट आणि ‘नोटा’चा वाढता प्रभाव हा ठाण्याच्या राजकारणातील अस्थिरतेचा स्पष्ट संकेत मानला जात आहे. प्रभागनिहाय विचार करता प्रभाग क्रमांक २ मध्ये सर्वाधिक ६,०७७ ‘नोटा’ मते नोंदली गेली, तर प्रभाग क्रमांक १८ मध्ये सर्वात कमी ८३४ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली.

ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांतील शहरात एकूण १६ लाख ४९ हजार ८६९ मतदार होते. त्यामध्ये ८ लाख ६३ हजार ८७९ पुरुष, ७ लाख ८५ हजार ८३१ महिला आणि १५ इतर मतदार यांचा समावेश होता. यापैकी ९ लाख १७ हजार १२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ४ लाख ८३ हजार ६९८ पुरुष, ४ लाख ३३ हजार ३८५ महिला आणि ४० इतर मतदार होते. यंदा मतदानाची टक्केवारी ५५.५९ टक्के इतकी नोंदवली गेली.

अलीकडील राजकीय घडामोडी, पक्षांतरे आणि अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणेकर मतदारांनी उमेदवारांना नाकारत ‘नोटा’द्वारे आपला रोष व्यक्त केला, असे स्पष्टपणे दिसून आले. राजकीय वर्तुळात चर्चेनुसार, मागील काही वर्षांत उमेदवारांची सततची पक्षांतरं, निष्ठेचा अभाव आणि वैचारिक गोंधळ यामुळे सुशिक्षित ठाणेकर मतदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.

८ ते १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही महापालिका निवडणूक झाली असली, तरीही मतदारांनी अनेक प्रस्थापित नेत्यांना नाकारत आपला असंतोष व्यक्त केला आहे. सव्वा लाखांहून अधिक मते ‘नोटा’ला पडणे ही बाब आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

उल्हासनगरमध्ये नाराजीचा स्फोट!

उल्हासनगर : लोकशाहीच्या रणांगणात यंदा उमेदवारांपेक्षा मतदारांची नाराजी अधिक ठळकपणे समोर आली. उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात ‘नोटा’चा पर्याय निवडत राजकीय पक्षांना थेट आरसा दाखवला आहे. तब्बल ३९,२२२ नोटा मतांमधून “आमचा पर्याय तुम्ही नाही” असा रोखठोक संदेश देत अनेक प्रभागांत निकाल उलटवू शकणारी नाराजी उघडपणे व्यक्त झाली.

ही निवडणूक केवळ विजयी उमेदवारांची यादी न राहता, मतदारांच्या मनातील असंतोषाची ठळक राजकीय नोंद ठरली आहे. प्रभाग क्रमांक १ ते २० मधील अ, ब, क व ड या सर्व जागांचा एकत्रित विचार करता ३९,२२२ नोटा मते नोंदली गेली. हा आकडा शहराच्या राजकारणासाठी गंभीर आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करणारा आहे.

प्रभागनिहाय आकडेवारी पाहता, प्रभाग १३ मध्ये सर्वाधिक ३,९२१ नोटा नोंदल्या गेल्या, तर प्रभाग २० मध्ये सर्वात कमी ८५७ नोटा पडल्या. याशिवाय प्रभाग ११ मध्ये २,७५९, प्रभाग ६ मध्ये २,५५३, प्रभाग १२ मध्ये २,२१५ आणि प्रभाग ८ मध्ये २,०२२ नोटा मतांनी मतदारांचा असंतोष स्पष्टपणे समोर आला. हे आकडे स्थानिक प्रश्नांची उपेक्षा, उमेदवारांची प्रतिमा आणि पक्षीय कार्यपद्धतीबाबतची नाराजी अधोरेखित करतात.

या निवडणुकीतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे अनेक प्रभागांत विजय-पराजयाचा फरक हा नोटा मतांपेक्षा कमी राहिला.

प्रभाग ४ (क) मध्ये अवघ्या १६ मतांनी विजय ठरला, मात्र तेथे २५१ नोटा नोंदल्या गेल्या.

प्रभाग ७ (अ) मध्ये ३८ मतांनी विजय, पण ३१५ नोटा पडल्या.

प्रभाग ९ (अ) मध्ये २०९ मतांच्या फरकाच्या तुलनेत ४९७ नोटा नोंदल्या गेल्या.

प्रभाग १५ (ड) मध्ये अरुण आशान यांनी भाजपचे धनंजय बोडारे यांचा १६४ मतांनी पराभव केला; मात्र येथेही ५७९ नोटा मते नोंदली गेली.

या सर्व आकडेवारीतून एक बाब ठळकपणे समोर येते, जर नोटा मते एखाद्या एका उमेदवाराच्या बाजूने वळली असती, तर अनेक प्रभागांचे निकाल बदलले असते. राजकीय अभ्यासकांच्या मते, हा प्रकार सर्वच राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे. उमेदवार निवडीत पारदर्शकता, स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका, जनतेशी प्रामाणिक संवाद आणि विश्वासार्ह नेतृत्व याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास, आगामी निवडणुकांत ‘नोटा’ हा असंतोषाचा आवाज आणखी प्रखर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रभागनिहाय ‘नोटा’ मते (१ ते २०)

प्रभाग १ : १,९९७

प्रभाग २ : २,०२७

प्रभाग ३ : २,०२६

प्रभाग ४ : १,१९२

प्रभाग ५ : १,७३१

प्रभाग ६ : २,५५३

प्रभाग ७ : १,६०४

प्रभाग ८ : २,०२२

प्रभाग ९ : १,३७४

प्रभाग १० : १,३१०

प्रभाग ११ : २,७५९

प्रभाग १२ : २,२१५

प्रभाग १३ : ३,९२१

प्रभाग १४ : १,९३७

प्रभाग १५ : १,९१३

प्रभाग १६ : २,०६४

प्रभाग १७ : १,९९६

प्रभाग १८ : १,८७३

प्रभाग १९ : १,८४१

प्रभाग २० : ८५७

logo
marathi.freepressjournal.in