५० हजार व्यापारांना नोटिस; व्यवसाय परवान्यातून उल्हासनगर पालिकेला मिळणार २५ कोटींचे वार्षिक उत्पन्न

या व्यवसाय परवान्यातून महापालिकेला वर्षाला जवळपास २५ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे
५० हजार व्यापारांना नोटिस; व्यवसाय परवान्यातून उल्हासनगर पालिकेला मिळणार २५ कोटींचे वार्षिक उत्पन्न

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेने शहरातील जवळपास ५० हजार व्यापाऱ्यांना व्यवसाय परवान्यासाठी नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या व्यवसाय परवान्यातून महापालिकेला वर्षाला जवळपास २५ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे; मात्र महापालिकेने कुठलीही प्रक्रिया न राबवता थेट व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्याप्रकरणी काही व्यापारी आणि लोकप्रतिनिधींनी मात्र याला विरोध दर्शवला आहे; मात्र शासकीय नियमानुसार ही प्रक्रिया सुरू असून, केवळ राजकीय लाभासाठी हा विरोध होत असल्याचे पालिका उपायुक्तांनी स्पष्ट केले आहे.

उल्हासनगर महापालिका हद्दीतील शासकीय सेवांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांकडून त्या सेवांच्या मोबदल्यात कररूपात शासनाकडे भरणा करण्याबाबत प्रचंड उदासिनता बाळगल्याचे पहायला मिळते. त्यातून पालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मोठा परिणाम होत असतो. यातून आर्थिक गणिते जुळवताना महापालिकेचीही दमछाक होत असते. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी महापालिकेने परवान्या अभावी गेली अनेक वर्षे व्यवसाय करणाऱ्या शहरातील जवळपास ५० हजार लहान, मोठ्या व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार महापालिका हद्दीत व्यवसाय करण्यासाठी महापालिकेचा परवाना घेणे बंधनकारक आहे; मात्र उल्हासनगर शहरात व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून परवान्याअभावीच व्यवसाय करत असल्याने पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी सांगितले. त्यामुळे शहरातील प्रत्येक व्यापाऱ्यांच्या दुकानांची नोंदणी करत त्यांना नोटिसा बजावण्यात येत असून, आतापर्यंत १० हजार व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्याने ५० हजार व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत.

पालिकेने प्रक्रिया राबवली नसल्याचा आरोप

याबाबत व्यापाऱ्यांच्या बैठकाही घेण्यात आल्या असून, व्यापाऱ्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शेकडो व्यापाऱ्यांना परवान्यासाठी महापालिकेत अर्ज केल्याचे नाईकवाडे यांनी सांगितले; मात्र महापालिकेने याबाबत जाहिरात प्रसिद्ध करणे, हरकती, सूचना मागवणे यासाठी कुठलीही प्रक्रिया न राबवता राज्य शासनाच्या नियमांची पायमल्ली करत परवान्यासाठी व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्याने या प्रक्रियेला साई पार्टीचे अध्यक्ष जीवन ईदनानी यांनी आयुक्तांना पत्र व्यवहार करत विरोध दर्शवला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in