वाहतूककोंडीतून सेंट्रल पार्कची सुटका; शनिवार-रविवारी प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत मोठे बदल

सेंट्रल पार्कमुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी पार्ककडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात मोठे बदल करण्याचा निर्णय वाहतूक विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.
वाहतूककोंडीतून सेंट्रल पार्कची सुटका; शनिवार-रविवारी प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत मोठे बदल

ठाणे : सेंट्रल पार्कमुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी पार्ककडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात मोठे बदल करण्याचा निर्णय वाहतूक विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. विशेष करून शनिवारी आणि रविवार दोन दिवस पार्क बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने हे वाहतूक बदल दोन दिवसांपुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. शनिवारी आणि रविवारी या दोन दिवशी ही वाहतूक शहराबाहेरून म्हणजेच बा‌ळकुम येथून भिवंडीकडे जाणाऱ्या मार्गावरील दोस्ती वेस्ट कॉन्ट्री या प्रकल्पाजवळील पर्यायी मार्गावरून वळ‌विण्यात येणार आहे.

तब्बल २० एकरमध्ये बांधण्यात आलेले सेंट्रल पार्क हे ठाणेकर आणि ठाण्याच्या बाहेरील नागरिकांसाठी पर्वणी ठरत असले तरी, आता सेंट्रल पार्कमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे स्थानिक नागरिक मात्र हैराण झाले आहेत. पार्क बघण्यासाठी आणि पार्कचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, विशेष करून शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी तर मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या वाहनाने हे पार्क बघण्यासाठी येत असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून पर्यायाने स्थानिक नागरिकांना घराच्या बाहेर पडणे देखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे पार्कला जाण्यासाठी काही तरी पर्यायी मार्ग काढावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आली होती. त्यामुळे आता वाहतुकीमध्ये मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भातील अधिसूचना ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी काढली आहे.

सेंट्रल पार्कमध्ये वाहनतळाची सुविधा असून त्याठिकाणी २०० ते २५० वाहने उभी करण्याची क्षमता आहे. वाहनतळात जागा उपलब्ध झाली नाही तर, पर्यटक परिसरातील रस्त्यावर वाहने उभी करतात. त्याची संख्या दोन ते अडीच हजार इतकी आहे. या पार्किंगमुळे नंदीबाबा मंदिर चौक, ढोकाळी नाका, पार्क सिटी, लोढा आमारा आणि कोलशेत गांव या मार्गावर वाहतूककोंडी होते. तसेच कल्पतरू गृहसंकुलामध्ये रहिवासी राहण्यासाठी आल्यानंतर वाहनांची संख्या २२०० इतकी होणार आहे. तसेच ब्रॉडवे ऑटोमोबाईल्स पेट्रोल पंप ते विहंग इन हॉटेल या सेवा रस्त्यावर मलवाहिनी टाकण्यात येणार असून त्याचबरोबर मलजोडणीची कामे करण्यात येणार आहे. यासाठी खोदकाम करण्यात येणार असल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद करावा लागणार आहे. यामुळे परिसरात कोंडी होण्याची शक्यता आहे. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी येथील मार्गात वाहतूक बदल लागू केले आहेत.'

या मार्गांमध्ये बदल

कापूरबावडी सर्कल येथून येणारी वाहने बाळकुम नाका सिग्नल येथून दादलानी पार्ककडे जाणाऱ्या चौकातून ठाण्याहून भिवंडीकडे जाणाऱ्या वाहिनीवरील दोस्ती वेस्ट कॉन्ट्री प्रकल्पाच्या प्रवेशद्वारातून पार्कच्या दिशेने जातील. याच मार्गे कळवा-साकेत येथून येणारी वाहने पार्कच्या दिशेने जातील. काल्हेर-कशेळी-भिवंडी मार्गे येणारी वाहने दादलानी पार्क चौकातून वळण घेऊन ठाणे-भिवंडी वाहिनीवरून पुढे दोस्ती वेस्ट कॉन्ट्री प्रवेशद्वारातून पार्कच्या दिशेने जातील.

ही अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, प्राणवायू आणि गॅस वाहने, इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही. ३० दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर हे बदल लागू करण्यात आलेले असून पार्कमध्ये जाणाऱ्या नागरिकांनी या मार्गाचा वापर करावा.

- डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस उपायुक्त ठाणे वाहतूक शाखा

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in