नशेचा धूर थेट शाळा-महाविद्यालयांपर्यंत;अस्वस्थ पालक, उदासीन यंत्रणा

तंबाखूजन्य पदार्थांच्या खुलेआम विक्रीवर अनेक वर्षांपूर्वी शासनाकडून कायद्यान्वये बंदी घालण्यात आली आहे
नशेचा धूर थेट शाळा-महाविद्यालयांपर्यंत;अस्वस्थ पालक, उदासीन यंत्रणा
Published on

सुसंस्कृत ठाणे शहरात शाळकरी मुले नशेच्या विळख्यात अडकत चालली आहेत. नशेचा धूर शाळा-महाविद्यालय आवारात पोहचल्यामुळे ठाणे शहरातील पालक अस्वस्थ झाले आहेत. ठाणे शहरात नुकताच अमली पदार्थ दुष्परिणाम या विषयी एका जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांतर्गत चर्चासत्रात अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा करण्यात आल्यानंतर ठाणे शहरातील शाळेच्या आसपास असलेल्या टपऱ्या हे अमली पदार्थाची केंद्र असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

जनजागृती कार्यक्रमात ठाणे शहरातील महाविद्यालयाचे प्राचार्य, विविध शाळांचे मुख्याध्यापक त्याचप्रमाणे नामवंत कोचिंग क्लासेसचे संचालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी सर्वांचा सूर ठाणे शहरात शाळेच्या आसपास असलेल्या पानटपऱ्या, ई-सिगारेट त्याचप्रमाणे गुटखा आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचा होता, या संदर्भात बैठकीस उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर सर्वांनी नाराजी व्यक्त करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

पानटपरीवर मिळणाऱ्या वेगवेगळ्या नावाच्या गोळ्या सेवन करून विद्यार्थी शाळेत येतात, त्यावेळी मुले नशेत असल्याचे मोठ्या प्रमाणात निदर्शनास आले आहे. शाळेत अनेकवेळा मुलांची झडती घेतली असता दप्तरात, खिशात नशेच्या गोळ्यांची पाकिटे, गुटखा, तंबाखू सापडत असल्याचे यावेळी शिक्षकांनी सांगितले. एका मुलापासून दुसऱ्या मुलापर्यंत ही साखळी वाढतं जाते, त्याचप्रमाणे महाविद्यालय परिसरात ई-सिगारेटची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची बाब देखील यावेळी समोर आली. खासगी क्लासेसच्या चालकांनी यावेळी क्लासेस असलेल्या परिसरात गुटखा विक्री होत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे एमडीसह, कुत्ता गोळी, रोलेटसह अन्य प्रतिबंधित पदार्थांची विक्री खुलेआम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

पोलीस यंत्रणा उदासीन

तंबाखूजन्य पदार्थांच्या खुलेआम विक्रीवर अनेक वर्षांपूर्वी शासनाकडून कायद्यान्वये बंदी घालण्यात आली आहे.परंतू या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात पोलीस यंत्रणेला अपयश आले आहे. परिणामी सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटख्याची बाजारात खुलेआम जाहिरात आणि विक्री केली जात आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी नशेच्या आहारी जात असताना प्रौढ व्यक्ती देखील नशेच्या विळख्यात सापडत असल्यामुळे अनेक कुटुंब उद‌्ध्वस्त होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विविध प्रकारात तंबाखूचे सेवन करत असल्याने दरवर्षी अकाली मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे सरकारी आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे. दरवर्षी पन्नास हजार लोकांचा अकाली मृत्यू होत असताना राज्यात दररोज एक हजारपेक्षा अधिक मुले तंबाखूच्या आहारी जात असल्याची बाब एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

कोटपा कायदा म्हणजे काय?

सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा अधिनियम २००३ हा केंद्राचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. तसेच बालकांना किंवा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्यास १ लाख रुपये आणि ७ वर्ष शिक्षेची तरतूद आहे. शाळेच्या १०० यार्ड परिसरात दुकान किंवा पानटपरीवर सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थ विकले जात असल्यास त्यावर कारवाई करून त्याचे परवाने रद्द करणे. त्यांची माहिती तात्काळ महानगरपालिका, नगरपालिका यांना देणे बंधनकारक आहे. सार्वजनिक वाहतुकीत समावेश असलेल्या बस, टॅक्सी व रेल्वेस्थानक परिसरात धूम्रपानावर बंदी घालणारे सूचना फलक मुख्य ठिकाणी लावणे, तंबाखूजन्य पदार्थांच्या कोणत्याही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष जाहिरातीस प्रतिबंध करणे आदींचा समावेश आहे.

कायद्याचे अपयश

महाराष्ट्रात तंबाखू कायद्याचे अपयश इतर राज्यांच्या तुलनेने अधिक आहे. या बैठकीत आरोग्य विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समिती, अन्न व औषध प्रशासन विभाग, शिक्षण विभाग, महानगरपालिका, नगरपालिका इत्यादी विभागांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात यावे, अशा सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. मात्र, अशा बैठकांचे पोलिसांकडून आयोजन केले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in