
ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी पावसाळ्यात महापालिकेच्या सर्व यंत्रणांचे समन्वयक अधिकाऱ्यांना सातही दिवस 24 तास उपलब्ध असणे आवश्यक असण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच रस्त्यांवरील गटारीवर झाकण नसल्याने जर कोणताही अपघात झाला तर कारवाई करण्यात येईल, अशा इशारा देखील त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला आहे.
ठाण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी महत्वाच्या सुचना केल्या. या बैठकीला महापालिकेसह सर्व यंत्रणांचे समन्वयक अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना बांगर यांनी पावसाळ्यात काही अघटीत घडू नये, यासाठी खबदारी घेण्याच्या सुचना केल्या. तसेच पावसाळ्यात गटारांवर झाकणे नसल्याने नागरिक त्यात पडून अपघात झाले आहेत. या दुर्घटना घडू नयेत, यासाठी बांगर यांनी अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना केल्या. सगळी गटारे, त्यांची झाकणे, त्यावरील जाळ्या यांची तपासणी करुन घ्यावी. पावसाळ्यात फुटभर पाणी साचले आणि गटाराचे झाकण उघडे असेल तर त्यात कोणी पडून जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे याची पाहणी करावी. अशा सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. एकाही गटारीचे झाकण उघडे दिसले तर जबादारी निश्चित करुन त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
दूषित पाण्याच्या तक्रारींची ठिकाणे शोधून त्या भागात पाणी शुद्धीकरणाची औषधे वाटणे, साथीच्या आजारांचे विभाग हेरून त्यासाठी प्रतिबंधक उपाय केले जावेत. असे देखील त्यांनी स्पष्ट केले. विहीरी, हातपंप आणि टॅंकर अशा स्त्रोतांमधले पाणी तपासावे. ते पाणी दूषित असल्यास त्याचा वापर बंद करण्याच्याही सुचना त्यांनी केल्या. यावेळी त्यांनी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचे काम सध्या पूर्ण क्षमतेने सुरु नसल्याचे लक्षात घेवून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आपत्कालीन व्यवस्थेचे नियोजन करून आवश्यकतेनुसार अतिरिक्त डॉक्टर, परिचारिका उपलब्ध करुन द्यावे, अशा सुचना त्यांनी या बैठकीत दिल्या.
अधिकारी सातही दिवस 24 तास उपलब्ध हवेत
या बैठकीत आयुक्त अभिजीत बांगर यांनी आधिकाऱ्यांना सातही दिवस आणि 24 तास उपलब्ध असण्याच्या सुचना केल्या. यावेळी मोबाईल नाही, नेटवर्कमध्ये नाही. रेंज नाही. अशी कारणे देवू नका, असे देखील ते म्हणाले. शहरात मेट्रोच्या कामासाठी उभारलेले मार्गरोधक आवश्यक आहेत. तेवढेत ठेवा. म्हणजे वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल.
यावेळी त्यांनी पावसाळ्यात जर कोणत्या भागात दुरुस्तीसाठी वीज पुरवठा बंद करावा लागणार असेल तर जिल्हा पोलीस आणि महापालिका यांच्या आपत्ती कक्षाला अगोदर त्याची माहिती द्यावी. ऐनवेळी वीज पुरवठा खंडित झाला असेल तर कोणत्या भागात वीज नाही, वीज पुरवठा सुरळीत व्हायला किती वेळ लागेल याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला द्यावी. जेणेकरुन ती माहिती अत्यावश्यक यंत्रणांना सांगितली जाईल. उघड्या वीज वाहिन्या, धोकादायक असलेले खांब, डीपी यांची पाहणी करुन योग्य ती देखभाल करावी. नाल्यांची सफाई आणि रस्त्यांच्या कामांवेळी महावितरणचा स्थानिक अधिकारी त्याठिकाणी हजर असालया हवे. अशा सुचना बांगर यांनी अधिकाऱ्यांना केल्या.