भाजप जिल्हा कार्यालयात पदाधिकारी आपापसात भिडले

हा वाद ज्या ४२ कोटींच्या निविदा प्रक्रियेमुळे उफाळून आला होता ती निविदा प्रक्रिया भाजपच्या इच्छेप्रमाणे आयुक्तांनी सेट केली.
भाजप जिल्हा कार्यालयात पदाधिकारी आपापसात भिडले

उल्हासनगर : महिन्याभरापूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी पालिकेच्या भ्रष्ट कारभारावर तसेच मागील काही वर्षांमध्ये शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक आरोप करत पालिकेने झा.पी. कंपनीला काळ्या यादीत टाकले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र या गोष्टीला महिना उलटून गेल्यावरही भ्रष्टाचाराच्या आरोपावर काही एक होताना दिसत नसल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट भाजप जिल्हाध्यक्षांना एका बैठकीदरम्यान लक्ष्य केले. त्यामुळे दोन गटात शिवीगाळ होऊन हाणामारीपर्यंत पोहोचल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

हा वाद ज्या ४२ कोटींच्या निविदा प्रक्रियेमुळे उफाळून आला होता ती निविदा प्रक्रिया भाजपच्या इच्छेप्रमाणे आयुक्तांनी सेट केली. त्यामुळे भाजपने आपले आंदोलनाचे हत्यार म्यान केले. असे असले तरी महिन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेच्या बातम्या प्रसिद्धीमाध्यमांवर झळकल्यामुळे जनता आम्हाला विचारत आहे की, या आरोपांचे पुढे काय झाले असा प्रश्न भाजप पदाधिकारी निलेश बोबडे यांनी दुपारी जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत थेट जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांना विचारला.

यावर थेट उत्तर देणे टाळत भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला निलेश बोबडे यांच्या अंगावर सोडण्यात आले. त्यावेळी भाजप पदाधिकारी मनीष हिंगोराणी आणि कपिल अडसूळ यांनी त्या लासी नामक पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची चर्चा शहरात आहे.

फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगर महापालिकेतील कंत्राटदार झा.पी. याची कंपनी खोटी कागदपत्रे सादर करून कोट्यवधीचे कंत्राट घेत असल्याचा खळबळजनक आरोप भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदीप रामचंदानी यांनी मागील महिन्यात केला होता. यावेळी भाजप आमदार कुमार आयलानी, माजी महापौर मीना आयलानी, माजी नगरसेवक राजेश वधारिया, शेरी लुंड, डॉ. प्रकाश नाथानी, किशोर वनवारी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. झा.पी. ही कंपनी नियमबाह्य पध्दतीने काम करीत आहे, या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार करून झा.पी कंपनीला ब्लॅकलिस्ट करावे. तसेच या कंपनीविरोधात १५ दिवसांच्या आत फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा, अशी भाजपची मागणी असून जर ही कारवाई झाली नाही तर पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी दिला होता.

logo
marathi.freepressjournal.in