अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला

उल्हासनगरच्या राजकारणात निवडणुकीच्या उंबरठ्यावर एक नाट्यमय घडामोड घडली आहे. दीर्घकाळ दिशाहीन भटकंतीनंतर अखेर टीओके नेता ओमी कलानी यांनी शिवसेना शिंदे गटाचा हात धरला आणि या अनपेक्षित कराराने उल्हासनगर शहराच्या राजकीय पटावर खळबळ उडवली. .
अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला
Photo : X (@DrSEShinde)
Published on

उल्हासनगर : उल्हासनगरच्या राजकारणात निवडणुकीच्या उंबरठ्यावर एक नाट्यमय घडामोड घडली आहे. दीर्घकाळ दिशाहीन भटकंतीनंतर अखेर टीओके नेता ओमी कलानी यांनी शिवसेना शिंदे गटाचा हात धरला आणि या अनपेक्षित कराराने उल्हासनगर शहराच्या राजकीय पटावर खळबळ उडवली. महायुतीतील समीकरणांना तडा देणारी ही हातमिळवणी कुणासाठी वरदान ठरणार आणि कुणासाठी ओझं, हे येणारा काळच सांगेल.

शनिवारी झालेल्या एका अनपेक्षित कराराने उल्हासनगरच्या राजकारणात वादळ निर्माण केले. राजकीय आधाराच्या शोधात भटकणाऱ्या टीम ओमी कलानीचे प्रमुख नेते ओमी कलानी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अखेर शिवसेना शिंदे गटाने आपल्यासोबत युतीमध्ये सामावून घेतले. या “दोस्तीच्या गठबंधनाने” स्थानिक विरोधकांपुढे नवे आव्हान उभे केले आहे.

मात्र ही काही धोरणात्मक खेळी नसून हा निर्णय टीओके साठी स्वतःचे अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न आहे असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. या करारामागे टीओके नेते ओमी कलानी यांची मोठी धडपड आणि राजकीय दडपण स्पष्टपणे दिसते. टीओके पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते इतरत्र जाऊ नयेत म्हणून ही हातमिळवणी केल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे उल्हासनगरसारख्या संवेदनशील राजकीय पटावर या कराराचा किती परिणाम होईल, हे अद्याप अनिश्चित आहे.

लक्षवेधी बाब म्हणजे, या करारावेळी कोणताही मोठा शिवसेना नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे हा निर्णय कलानी आणि शिंदे गटासाठी मजबुरीचा भाग होता का, असा प्रश्न उपस्थित होतो.

थोडक्यात, उल्हासनगरमध्ये झालेली ही हातमिळवणी महायुतीच्या समीकरणांना मोठे आव्हान ठरते का, की फक्त टीम ओमी कलानीच्या अस्तित्व रक्षणाची धडपड ठरते, हे आगामी निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होईल.

डुबते को तिनके का सहारा

ओमी कलानी यांनी याआधी भाजपमध्ये प्रवेशासाठी पक्षाचे उंबरठ्या झिजवल्या होत्या, मात्र वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना दाराबाहेरच ठेवले. अखेरीस “सामान्य सदस्य” म्हणून शिंदे गटात सामील होण्याची वेळ त्यांच्यावर आली. यामुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवर या कराराला “डुबते को तिनके का सहारा” अशी उपमा दिली जात आहे. मात्र, या हातमिळवणीमुळे शिंदे गटालाही भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी चर्चा आहे. कारण करारावेळी उपस्थित असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर अपेक्षित उत्साह किंवा समाधान दिसले नाही.

logo
marathi.freepressjournal.in