एसटी डेपो सुधारण्यासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम; खोपट बस स्थानकाची केली पाहणी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ॲक्शन मोडवर

राज्याच्या परिवहन मंत्रिपदाची धुरा हातात घेतल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोची पाहणी केली आहे.
एसटी डेपो सुधारण्यासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम; खोपट बस स्थानकाची केली पाहणी,  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ॲक्शन मोडवर
Published on

ठाणे : राज्याच्या परिवहन मंत्रिपदाची धुरा हातात घेतल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोची पाहणी केली आहे. या पाहणीदरम्यान समोर आलेल्या डेपोतील दुरावस्थेवरून मंत्री सरनाईक यांनी परिवहन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. एस खोपट बसस्थानकाची केली त्यावेळी कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा देण्याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्याचीही अंमलबजावणी झाली नसल्याने सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. सुरुवातीलाच कारवाई करणे योग्य नसून सुधारण्यासाठी आपण एका महिन्याचा कालावधी दिला असल्याचे यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

परिवहन मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोत आपला पहिला पाहणी दौरा करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान डेपोतील दुरावस्था, अस्वच्छता पाहून सरनाईक यांनी पहिल्याच दिवशी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ फेब्रुवारी रोजी खोपट बस आगार येथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटनप्रसंगी परिवहन सेवा व आगार कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा सुधारणाकरिता काही सूचना दिल्या होत्या, त्याची अद्यापही प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नसल्याने सरनाईक यांनी खोपट एसटी डेपोतील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे योग्य नाही

लग्नसोहळ्यानिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र पाहायला मिळाले असले तरी, ठाकरे परिवार आहे, कौटुंबिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ते एकत्र येतच असतात. राज्याच्या राजकारणात दोघांचे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी कौटुंबिक कार्यक्रमात ते एकत्रित आले यामध्ये कोणी राजकारण बघू नये, अशी प्रतिक्रिया सरनाईक यांनी यावेळी दिली. उद्धव ठाकरे यांची जेव्हा एन्जोप्लास्टिक झाली तेव्हा स्वतः राज ठाकरे गाडी चालवत उद्धव ठाकरेंना गाडीतून घेऊन आले होते, कौटुंबिक प्रसंग असे घडतच असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

पालकमंत्रिपद एकनाथ शिंदेंनाच मिळायला हवे

ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर ठाणे जिल्ह्यात एकमेव नेतृत्व आहे ते आमचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे. त्यांच्या कार्यकाळामध्ये पालकमंत्री म्हणून जे त्यांनी काम केले आहे ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेले आहे. ठाणे जिल्हा प्रगतिपथावर घेऊन जाण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, धर्मवीर आनंद दिघे यांनी जो बालेकिल्ला ठेवला होता तोच कायम ठेवण्याच काम एकनाथ शिंदे करत आहेत.

कोणतेही खाते मोठे किंवा लहाण नसल्याचे सांगत या खात्याला पूर्णपणे न्याय माझ्याकडून दिला जाईल. तसेच आम्ही येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रितपणे लढणार आहोत, परंतु स्थानिक पातळीवरचे जे काही निर्णय, असतील ते निवडणुका जाहीर झाल्यावर घेतले जाणार आहेत.

- आ. प्रताप सरनाईक, राज्य परिवहन मंत्री

logo
marathi.freepressjournal.in