उधारीचे पैसै न दिल्याने एकावर गोळीबार; दोन आरोपींना अटक

वडिलांनी दिलेले उधारीचे पैसै परत करत नसल्याच्या रागातून संजय जाधव यांच्यावर गोळीबार केलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
उधारीचे पैसै न दिल्याने एकावर गोळीबार; दोन आरोपींना अटक

उल्हासनगर : अंबरनाथ पश्चिमेतील वांद्रापाडा परिसरात रस्त्यावर पोलिसांना पाच काडतुसे असलेले रिव्हॉल्वरच्या पुंगळ्या आढळल्या होत्या. तर या रिव्हॉल्वरमधून संजय जाधव नावाच्या व्यक्तीवर गोळीबार झाल्याची चर्चा गेल्या आठवडाभर सुरू होती. मात्र झाडलेल्या गोळीचे कुठलेच अवशेष पोलिसांना आढळले नसल्याने या गोळीबाराबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र संजय जाधव यांच्यावर याच रिव्हॉल्वरमधून एक गोळी झाडत तीन आरोपी दुचाकीवरून फरार झाल्याचे समोर आले आहे. वडिलांनी दिलेले उधारीचे पैसै परत करत नसल्याच्या रागातून संजय जाधव यांच्यावर गोळीबार केलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

अंबरनाथ पश्चिमेतील बेथल चर्च परिसरात राहणारे आणि रिक्षा भाड्यावर देण्याचा व्यवसाय करणारे संजय जाधव हे गेल्या आठवड्यात याच परिसरात एका चहाच्या दुकानाजवळ बसले होते. यावेळी अचानक गोळी झाडल्याचा त्यांना आवाज आला. मात्र सुदैवाने त्यांना कुठलीही इजा झाली नाही. तर काही वेळानंतर जाधव बसलेल्या जागेपासून काही अंतरावर त्यांना रिव्हॉल्वरच्या पाच पुंगळ्या आढळून आल्या. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देत त्या पुंगळ्या पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामुळे जाधव यांच्यावर गोळीबार झाल्याची चर्चाही शहरात पसरली.

मात्र रिव्हॉल्वरमधील गोळी झाडलेल्या काडतुसाच्या नळ्या अथवा कुठलाही पुरावा पोलिसांना आढळला नाही. तसेच जाधव यांना फटाक्यासारखा आवाज आला असला तरी तेही गोळीबार झाल्याबाबत निश्चित नव्हते.

अखेर या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी तपास केला असता, १८ जानेवारी रोजी रात्रीच्या वेळेस जाधव यांना जीवे ठार मारण्यासाठी एक गोळी झाडण्यात आल्याचे समोर आले आहे. बदलापूर येथे राहणारे मृत नवीन खिच्ची यांनी संजय जाधव यांना पैसे दिले होते. मात्र संजय जाधव हे खिच्ची यांचे पैसे परत करत नसल्याच्या गैर समजूतीमुळे खिच्ची यांचा मुलगा निषांत (२२) याने त्याचा मित्र राहुल कुडीया (२४) आणि अजय चलवादी यांच्या मदतीने १८ जानेवारी रोजी आपल्या जवळील रिव्हॉल्वरमधून संजय जाधव यांच्यावर गोळीबार करत दुचाकीवर फरार झाल्याचे तपासात समोर आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे. यातील निषांत खिच्ची आणि राहुल कुडीया यांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

गोळीबार हा चिंतेचा विषय

या घटनेत २२ वर्षीय आरोपी तरुणांनी केलेला गोळीबार हा चिंतेचा विषय असून काही महिन्यापूर्वी अशाच प्रकारे बदलापूर येथील कात्रप पनवेल रस्त्यावर एका अल्पवयीन तरुणाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक तरूण जखमी झाला होता. त्यामुळे या तरुणांकडे रिव्हॉल्वरसारखे शस्त्र उपलब्ध होतात तरी कुठून ही गंभीर चिंतेची बाब असून शहरात असे किती आणखी तरुण गावठी कट्टे आणि रिव्हॉल्वर बाळगून आहेत याचा पोलिसांनी शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in