सूर्यघर योजनेची वर्षपूर्ती : सौरऊर्जा संच बसवून वीज ग्राहक बनले स्वावलंबी

दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी केंद्राने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेस नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले.
वीज निर्मितीबाबत २,४४८ ग्राहक स्वावलंबी
वीज निर्मितीबाबत २,४४८ ग्राहक स्वावलंबीसंग्रहित छायाचित्र
Published on

कल्याण : दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी केंद्राने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेस नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या योजनेचा महावितरणच्या भांडुप व कल्याण परिमंडलांतील ३ हजार २८३ ग्राहकांनी लाभ घेतला आहे.

घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मिळत आहे. घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसविता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे. याबरोबरच महावितरणकडून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे तसेच सौर नेटमीटरदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.

योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून निर्माण झालेली वीज ग्राहकांना वापरता येते. शिवाय ग्राहकाची गरज भागवून वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून ती विकत घेण्यात येत आहे. त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे. छतावरील सौरऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीज ग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे.

याबरोबरच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व सामायिक उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो.

भांडुप-कल्याण परिमंडलांत ३३०० लाभार्थी

महावितरणच्या भांडुप व कल्याण परिमंडलांत योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत भांडुप परिमंडलातील १८९९ ग्राहकांनी, तर कल्याण परिमंडलातील १३८४ ग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला आहे. या ग्राहकांनी आपल्या घराच्या छतावर सौरऊर्जा संच बसवून वीजनिर्मिती सुरू केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in