ऑनलाईनच्या गोंधळातही ९२ टक्के करवसुली; अंबरनाथ नगर परिषद कर्मचाऱ्यांचे कौतुक

अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रातून नगर परिषदेला ४७ कोटी ६४ लाख रुपये कर स्वरूपात येणे अपेक्षित होते. यंदाची झालेली कर वसुली पाहता पालिकेने ४४ कोटी ५१ लाख रुपये कर स्वरूपात गोळा केले आहेत. नगर परिषद प्रशासनाने तब्बल ९२.३७ टक्के कर वसुली केली आहे.
ऑनलाईनच्या गोंधळातही ९२ टक्के करवसुली;  अंबरनाथ नगर परिषद कर्मचाऱ्यांचे कौतुक
Published on

अंबरनाथ: गेल्या वर्षभरात ऑनलाईन प्रणालीचा गोंधळ सुरू असल्याने ऑनलाईन बिल भरणा जवळपास ठप्प झाला होता. असे असतानाही ९२ टक्के इतकी विक्रमी कर वसुली करण्यात अंबरनाथ नगर परिषदेला यश आले आहे. त्यामुळे अंबरनाथ नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

अंबरनाथ नगर परिषदेत पूर्वी एबीएम या कंपनीचे सॉफ्टवेअर वापरून कर वसुली केली जात होती. त्यामुळे या सॉफ्टवेअरच्या आधारावर जलद गतीने कर वसुली सहजरित्या करता येत . मात्र गेल्या वर्षी शासनाने या सॉफ्टवेअरला पर्यायी सॉफ्टवेअर उपलब्ध करून देत सर्व नगरपालिकांना आयडब्ल्यूबीपी हे सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले आणि त्याच सॉफ्टवेअरच्या आधारावर कर वसुली करण्याचा सल्ला दिला. मात्र ही नवीन यंत्रणा पूर्ण पणे बंद अवस्थेत होती. तसेच या सॉफ्टवेअरमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे त्याचा नाहक त्रास अधिकाऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना होत होता. मात्र सॉफ्टवेअर चालत नसतानाही अंबरनाथ नगर परिषदेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले. अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रातून नगर परिषदेला ४७ कोटी ६४ लाख रुपये कर स्वरूपात येणे अपेक्षित होते. यंदाची झालेली कर वसुली पाहता पालिकेने ४४ कोटी ५१ लाख रुपये कर स्वरूपात गोळा केले आहेत. नगर परिषद प्रशासनाने तब्बल ९२.३७ टक्के कर वसुली केली आहे. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक पराडकर, कर निरीक्षक नरेंद्र संख्ये आणि त्यांच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या या कर वसुलीच्या उद्दिष्ट पूर्तीबाबत समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या वर्षभरात सॉफ्टवेअरची मोठी अडचण होती. त्यामुळे हाताने कर पावती भरून एवढ्या मोठ्या प्रमाणात करवसुली करण्यात आली आहे. अर्थात त्यासाठी कर्मचाऱ्यांनी देखील प्रचंड मेहनत घेऊन आणि सुट्टीच्या दिवशीही काम करून पालिकेच्या कर वसुलीच्या उद्दिष्टाला यशस्वी केले आहे.

- नरेंद्र संखे, कर निरीक्षक

logo
marathi.freepressjournal.in