ऑनलाईन शिक्षणामुळे लहानग्यांच्या डोळ्यांना त्रास,पालकांची चिंता वाढली

ऑनलाइन शिक्षणावर तब्बल दोन वर्षे भर द्यावा लागल्याने, त्याचे दुष्परिणाम आता समोर येताना दिसत आहेत
ऑनलाईन शिक्षणामुळे लहानग्यांच्या डोळ्यांना त्रास,पालकांची चिंता वाढली

जव्हार तालुक्यामध्ये कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ऑनलाइन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण देण्यात आले, शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगले शिक्षण मिळवून विद्यार्थ्यांचा शालेय विकास ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून व्हावा, यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले गेले. परंतु, कोवळी नजर आणि कोवळे डोळे असल्याने मोबाईलच्या स्क्रीनचा लहानग्यांना त्रास होऊन डोळे दुखणे, डोळ्यांतून पाणी येणे, काहींना तर चष्मा लागल्याने चष्म्याचा भार लहानग्यांना सांभाळावा लागत असल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

कोरोना महामारीमुळे ऑनलाइन शिक्षणावर तब्बल दोन वर्षे भर द्यावा लागल्याने, त्याचे दुष्परिणाम आता समोर येताना दिसत आहेत. गेल्या १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थ्यांना फळ्यावर लिहिलेले शब्दच समजून घेणे अवघड होत आहे. त्यामुळे शिक्षकांसमोरील आव्हाने वाढली असून, विद्यार्थ्यांना डोळ्यांची तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला जात आहे. अशात अनेक तपासणीअंती समोर येऊ लागल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या चष्म्याचे नंबर वाढल्याचे पालकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शिक्षकांना अध्यापन करताना चांगलीच कसरत घ्यावी लागत आहे. विद्यार्थ्यांच्या या वाढत्या समस्या लक्षात घेऊन, त्यांना डोळे तपासणीचा सल्ला दिला जात आहे.

कोरोना काळात कार्यालयांपासून ते शाळांपर्यंत सर्वच ठप्प असल्याने, घरातूनच सर्व बाबी हाताळाव्या लागल्या. नोकरदारांना वर्क फ्रॉम होम, तर विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणावर भर द्यावा लागला. विद्यार्थ्यांना तासन्तास मोबाइलसमोर बसून, शिक्षणाचे धडे गिरवावे लागले. मोबाइलच्या छोट्या स्क्रीनवर बघून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी समजून घ्याव्या लागत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, गेल्या १५ जूनपासून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, बहुतांश विद्यार्थ्यांना फळ्यावर लिहिलेले शब्द समजून घेताना अडचणी येत आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे डोळे तपासणीअंती बहुतांश विद्यार्थ्यांच्या चष्म्याचा नंबर वाढल्याचे समोर येत आहे. चाळिशीत उद्भवणाऱ्या डोळ्यांच्या तक्रारी अवघ्या ८ ते १० वयाच्या मुलांमध्येच उद्भवू लागल्याने, पालकांचीही चिंता वाढली आहे. वास्तविक वयाच्या सहाव्या वर्षापासून मुलांची दृष्टी विकसित होते. मात्र, याच वयात मोबाइलचा अतिवापर वाढल्याने डोळ्यांची कायमस्वरूपी हानी होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in