ऑनलाईन दारुसाठी गुगलवर वाईन शॉपचा मोबाईल क्रमांक सर्च करणे एका वयोवृद्धाला चांगलेच महागात पडले होते. या वयोवृद्धाच्या क्रेडिट कार्डसह ओटीपी क्रमांक प्राप्त करुन अज्ञात सायबर ठगाने सुमारे दोन लाखांची ऑनलाईन फसवणुक केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आठ महिन्यांपासून फरार असलेल्या दोन सायबर ठगांना दहिसर पोलिसांनी अटक केली. संदीप विनोदकुमार कुशवाह आणि दिपक हरिकेश अग्रवाल अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ६१ वर्षांचे तक्रारदार दहिसर येथे राहत असून ते एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत ऑनलाईन दारु खरेदीसाठी त्यांनी गुगलवर जवळच्या वाईन शॉपचा क्रमांक सर्च केला होता. यावेळी त्यांना सोवरजीन वाईन शॉपचा मोबाईल क्रमांक सापडला होता. त्यामुळे त्यांनी मोबाईलववर संपर्क साधून त्यांच्याकडे ऑनलाईन दारुची ऑर्डर दिली होती. या व्यक्तीने पेमेंटसाठी त्यांच्याकडे त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती घेतली. त्यांनी त्याला क्रेडिट कार्डची माहितीसह मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक शेअर केला होता. त्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन दहा हजार शंभर रुपये डेबीट झाले होते. काही वेळानंतर या व्यक्तीने त्यांना पुन्हा फोन करुन आठशे रुपये कमी दिल्याचे सांगून त्यांच्याकडे पुन्हा क्रेडिट कार्डची माहितीसह ओटीपी क्रमांक घेतला. त्यामुळे त्यांनी त्याला क्रेडिट कार्डची माहितीसह ओटीपी क्रमांक शेअर केला होता. ओटीपी क्रमांक प्राप्त होताच या व्यक्तीने त्यांच्या कार्डवरुन काही ऑनलाईन व्यवहार केले होते. त्यामुळे त्यांच्या कार्डवरुन सुमारे दिड लाख रुपये डेबीट झाले होते. याबाबत त्यांनी त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने पैसे परत पाठविण्याचे आमिष दाखवून त्यांना ४८ हजार रुपये पाठविण्यास प्रवृत्त केले. अशा प्रकारे त्याने ऑनलाईन दारु डिलीव्हरी करण्याच्या नावाने त्यांच्या क्रेडिट कार्डसह ओटीपी क्रमांक प्राप्त करुन सुमारे दोन लाखांची फसवणुक केली होती. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना आठ महिन्यानंतर पोलिसांनी संदीप कुशवाह आणि दिपक अग्रवाल या दोघांना अटक केली. तपासात ते दोघेही ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.