फक्त ३५० दुकानांकडेच व्यवसायाचा परवाना! व्यवसाय परवान्यातून वर्षाला ११ कोटींचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा

या संदर्भात महापालिकेचे मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे यांनी सांगितले की, महापालिका कर्मचाऱ्यांनी दुकानदारांना नोटीस देण्यास सुरुवात केली
 फक्त ३५० दुकानांकडेच व्यवसायाचा परवाना! व्यवसाय परवान्यातून वर्षाला ११ कोटींचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील दुकानदार, हॉटेलचालक, घाऊक विक्रेते आणि इतर विविध व्यावसायिकांना आता व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सदर परवाना काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने दुकानदारांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. महापालिका प्रशासनाचा यामागे उत्पन्नाचा स्रोत वाढविण्याचा हेतू आहे. मुंबई आणि ठाणे महापालिकेकडूनही अशा प्रकारचा कर वसूल केला जातो. त्याच अनुषंगाने व्यवसाय कर वसूल करण्याचा अधिकार महापालिकेला आहे.

परवान्यातून महापालिकेला वर्षाला ११ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमध्ये ४० ते ४५ हजारांहून अधिक दुकानदार असून, दुकानदारांनी व्यवसाय परवाना घेतलेला नाही. महापालिकेचे आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आणि उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दुकानदारांना मालमत्ता आणि पाणी कर याशिवाय उत्पन्नाचे इतर स्त्रोत निर्माण करण्यासाठी व्यवसाय परवाना अनिवार्य केला आहे.

बाजार निरीक्षकाच्या पथकाने आतापर्यंत ४ हजारांहून अधिक दुकानदारांना व्यवसाय परवान्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत. कारण आतापर्यंत केवळ ७०० दुकानदारांनी व्यवसाय परवाना मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत.

दुकानदारांना नोटिसा

या संदर्भात महापालिकेचे मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे यांनी सांगितले की, महापालिका कर्मचाऱ्यांनी दुकानदारांना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. बहुतांश दुकानदारांना नोटिसा मिळाल्या आहेत. कारण शहरातील केवळ ३५० दुकानदारांकडे व्यवसायाचे परवाने असून, नोटीस मिळाल्यानंतर ७०० दुकानदारांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. शहरातील व्यापाऱ्यांनी व्यवसाय परवाने घेण्याचे आवाहन केणे यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in