

ठाणे : ठाणे वनपरिक्षेत्रात वाढत्या शिकारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने ‘ऑपरेशन सापळा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे वनपरिक्षेत्रात वन्यजीवांचे संरक्षण मजबूत करण्यासाठी या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अलीकडच्या काळात जंगलात वन्यप्राण्यांना पकडण्यासाठी सापळे लावल्याच्या घटना समोर आल्याने वनविभाग सतर्क झाला आहे. ‘अँटी स्नेर काेम्बिंग ऑपरेशन’ अंतर्गत विशेष पथके तयार करून अतिदुर्गम आणि संवेदनशील भागात सखोल शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेदरम्यान अधिकाऱ्यांनी जंगलातील पायवाटा, पाणवठे, स्थलांतर मार्ग आणि दाट झाडी असलेल्या भागांची तपासणी केली. वन्यप्राण्यांना अडकवण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी फासे, वायर ट्रॅप्स यांसारखी साधने शोधून नष्ट करण्यात आली. ही मोहीम मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. स्थानिक वनअधिकाऱ्यांसोबत वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन आणि रॉ या स्वयंसेवी संस्थांनीही सक्रिय सहभाग घेतला. ही कारवाई उपवनसंरक्षक (ठाणे), सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी ठाणे आणि वनक्षेत्रपाल येऊर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
‘सापळे शोधमोहिमा’ राबविणे गरजेचे
वन्यजीवांची शिकार करणे हा गंभीर गुन्हा असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच अशा ‘सापळे शोधमोहिमा’ नियमितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश वन्यजीवांचे संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे जतन आणि जैवविविधतेचे संतुलन राखणे हा आहे. विशेषतः बिबट्या, हरणे, ससे यांसारख्या प्राण्यांसाठी हे सापळे अत्यंत घातक ठरत असल्याने त्यांचे निर्मूलन करणे आवश्यक असल्याचे वनविभागाने सांगितले.