रेल्वे प्रवाशांकडून वातानुकूलित लोकलचा विरोध मावळला

मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये मरणाची गर्दी, दाटीवाटीचा प्रवास करावा लागतो.
रेल्वे प्रवाशांकडून वातानुकूलित लोकलचा विरोध मावळला
Published on

कळवा येथील प्रवाशांनी काही दिवसांपूर्वी एसी लोकलला विरोध करत आंदोलन छेडले होते. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रवाशांची भेट घेतली होती, तसेच बैठकीचे आयोजन केले होते. या दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट आव्हाड यांनी घेत आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र मध्य रेल्वेच्या एसी लोकलला जास्त पसंती मिळत असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहिर केले. एसी लोकलमुळे रेल्वेचा ७ पटीने नफा वाढला आहे.

रेल्वे प्रवाशांकडून वातानुकूलित लोकलला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता एसी लोकलचा विरोध मावळला असल्याचे बोलले जात आहे.

वातानुकूलित रेल्वे लोकलला ठाणे, डोंबिवली आणि कल्याण ही तीन स्थानके टॉप वर असून ७ पट नफा वाढला आहे. मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये मरणाची गर्दी, दाटीवाटीचा प्रवास करावा लागतो. प्रवाशांच्या उत्तम प्रतिसादामुळे वातानुकूलित रेल्वे लोकलला बळ मिळाले आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये वातानुकूलित रेल्वे लोकलचा प्रवास ५ हजार ९३९ प्रवाशांनी केला. सात महिन्यांनी ऑगस्ट २०२२ रोजी प्रवाशांची संख्या ४१ हजार ३३३ एवढी असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. यात ठाण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या १० लाख ५० हजार ५११, डोंबिवली मधून ९ लाख ३९ हजार ४३१ तर कल्याण मधून ९ लाख १ हजार ८५९ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती समोर आलेली आहे.

logo
marathi.freepressjournal.in