ठाणे-रायगडात डॉक्टरांमध्ये संतापाची लाट; भिवंडीत डॉक्टरांची निदर्शने, २४ तास वैद्यकीय सेवा बंद

कोलकाता येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करीत हत्या केल्याने संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात देशभरातील वैद्यकीय सेवेतील डॉक्टर निदर्शने करीत आहेत.
ठाणे-रायगडात डॉक्टरांमध्ये संतापाची लाट; भिवंडीत डॉक्टरांची निदर्शने, २४ तास वैद्यकीय सेवा बंद
सुमित घरत
Published on

सुमित घरत/भिवंडी : शनिवारी इंडियन मेडिकल असोसिएशन भिवंडी शाखेच्या वतीने भिवंडी शहरात शनिवारी मूक निदर्शन करण्यात आली. यावेळी २४ तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या भिवंडी शाखा अध्यक्षा डॉ. उज्ज्वला बर्दापूरकर, सरचिटणीस डॉ. संजीव कुमार रत्नापूरकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनात भिवंडी शहरातील असंख्य डॉक्टर सहभागी झाले होते. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयात आपल्या मागण्यांचे निवेदन देत २४ तासांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता वैद्यकीय सेवा बंद ठेवत असल्याचा निर्णय जाहीर केला.

कोलकाता येथील निर्घृण घटनेनंतर संपूर्ण देशभरातील वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून नराधम आरोपींना कठोर शासन करून मयत पीडितेला न्याय द्यावा, यासोबत वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या ठिकाणी योग्य ते सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी कायद्यामध्ये बदल करावेत, रुग्णालय परिसर सुरक्षित विभाग म्हणून जाहीर करावा अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.

कोपरीकरांनी व्यक्त केला संताप

अतुल जाधव /ठाणे : कोलकात्यातील महिला डॉक्टरची अत्याचारानंतर हत्या केल्याच्या घटनेबद्दल कोपरीकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोपरीत भव्य रॅली काढून दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच या हल्ल्याचा तीव्र निषेध करून पश्चिम बंगालमध्ये महिलांसाठी निर्भय वातावरण निर्माण करण्याची मागणी केली. या रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप ठाणे शहर सरचिटणीस डॉ. समीरा भारती, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, तारामाऊली सामाजिक संस्थेच्या कार्याध्यक्षा भावना भरत चव्हाण, डॉ. सोनल भरत चव्हाण, कोपरी मंडल अध्यक्ष शिवाजी रासकर यांचाही सहभाग होता.

मुरूडमध्ये मूक मोर्चा

संजय करडे/मुरूड-जंजिरा : पश्चिम बंगालमधील स्त्री डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि अमानुष खून प्रकरणाच्या निषेधार्थ जंजिरा मेडिकल असोसिएशन मुरूडच्या वतीने मूक मोर्चा काढून निषेध करण्यात आला. या संदर्भातले निवेदन मुरूड तहसीलदार, पोलीस निरीक्षक व वैद्यकीय अधीक्षक यांना देण्यात आले.

यावेळी जंजिरा मेडिकल असोसिएशन डॉ. संजय पाटील (अध्यक्ष), डॉ. वसीम पेशईमाम (सचिव), डॉ. अमित बेकर (खजिनदार), डॉ. राज कल्याणी, डॉ. मयुर कल्याणी, डॉ. मंगेश पाटील, डॉ. भाविका कल्याणी, डॉ. रवींद्र नामजोशी, डॉ. मकबुल कोकाटे, डॉ. निसार बिरावडकर, डॉ. हितेश जैन, मनीष प्रधान, डॉ. सदफ पेशईमाम, डॉ. शकील परदेशी, डॉ. श्रीया पाटील, डॉ. स्नेहा दिवेकर, डॉ. स्वप्नील दिवेकर, अंजली पाटील, सुनील पटेल, डॉ. खान आदीसह इतर डॉक्टर उपस्थित होते.

जंजिरा मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर काळ्या फिती लावून दवाखान्यात रुग्णांची तपासणी व सेवा देणार आहोत. रुग्णाची सेवा हीच ईश्वर सेवा असून रुग्णांचे कोणतेही हाल होणार नाहीत. याप्रकरणी ठोस कायदा व्हावा हे देखील गरजेचे आहे.

- डॉ.संजय पाटील (अध्यक्ष)

logo
marathi.freepressjournal.in