प्रतिनिधी/ठाणे
बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट झाली असल्याने ठाणे, रायगड जिल्ह्यात कडधान्याचे भाव वधारले आहेत. मागील वर्षी १०० ते १३० रुपये किलो मिळणारे वाल यंदा १७० ते २०० रुपये किलोने मिळत आहेत.
ठाणे आणि रायगड जिल्ह्यात कडधान्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास चार हजार ३८१ हेक्टरवर वालाची लागवड केली जाते. त्यानंतर मुग, मटकी, चवळी, तूर आदी कडधान्याची लागवड केली जाते. ग्राहकांची गोड व कडवे वाल, लहान चवळी आणि निडीच्या वालांना अधिक पसंती आहे. पावसाळ्यासाठी खेड्या-पाड्यासह शहरातील अनेकजण या कडधान्याची खरेदी करतात. त्यात गावठी कडधान्यांना अधिक पसंती आणि मागणी असते. बाजारात किरकोळ व घाऊक दरात कडधान्य उपलब्ध आहेत.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे सध्या वातावरणात बरेच बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात कडधान्य पिकांचे खूप नुकसान झाले. गेल्या वर्षाप्रमाणे यंदा वालाचे उत्पादन कमी झाल्याने भाव वधारले आहेत. रायगडातील सुधागड, पेण, पनवेल भागात रुचकर, स्वादिष्ट व मोठ्या वालाच्या शेंगा प्रसिद्ध आहेत. याच्या टपोऱ्या वालांना शहरातील ग्राहकांची अधिक पसंती असते; मात्र स्थानिक लोक छोट्या गावठी वालांना पसंती देतात, अशी माहिती परळी येथील घाऊक व्यापाऱ्यांनी दिली.
ग्राहकांची कडधान्य खरेदीसाठी लगबग सुरू
सध्या बाजारात ग्राहकांची कडधान्य खरेदीसाठी लगबग सुरू आहे. गावठी कडधान्यांना अधिक मागणी असते. बदलत्या हवामानामुळे उत्पादन घातल्याने यावर्षी कडधान्यांचे भाव मात्र वाढले असल्याचे घाऊक व किरकोळ कडधान्य विक्रेत्यांनी सांगितले. शहरी भागातील ग्राहक दरवर्षी पावसाळ्याच्या आधी गावठी कडधान्य विकत घेतात. यंदा भाव जास्त असल्याने ३ ते पाच किलो वाल खरेदी करणाऱ्या ग्राहक अवघ्या किलोभर मालावरच समाधान साधताना दिसत आहेत.
लिंबाच्या किमती वाढल्या
उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुले शरीराला थंडावा देण्यासाठी व ऊर्जा टिकविण्यासाठी लिंबू पाणी व सरबत सर्वात उत्तम पर्याय आहे. मात्र सध्या आवक कमी झाल्याने लिंबाचे भाव वधारले आहेत. डॉक्टर देखील उन्हाळ्यात लिंबू सरबत पिण्याचा सल्ला देतात. लिंबाला मागणी वाढत आहे. तसेच उसाचा रस काढताना देखील लिंबू लागतो. मात्र आवक कमी आणि किंमत जास्त यामुळे लिंबाने सर्वांना घाम पोडला आहे. लिंबाचे भाव वाढल्याने लिंबू सरबताचे भाव देखील आपोआप वाढले आहेत. हॉटेल प्लेटमधून देखील आता लिंबू गायब होऊ लागला आहे. मोठे लिंबू, तर सध्या बाजारात पहायला देखील मिळत नाहीत. किंमती वाढल्या असल्यातरी आरोग्यवर्धक लिंब खरेदी करतो, असे रमेश पवार यांनी सांगितले.