

ठाणे : भिवंडी तालुक्यातील पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राने आरोग्य सेवांच्या गुणवत्तेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय NQAS (National Quality Assurance Standards) गुणवत्ता मानांकन प्राप्त केले आहे. या मूल्यांकनात पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राने तब्बल ९०.९७ टक्के एकूण गुण मिळवले असून, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण आणि रुग्णकेंद्री आरोग्य सेवेला यामुळे मान्यता मिळाली आहे. विशेष म्हणजे रुग्ण समाधानाच्या निकषामध्ये केंद्राला ५ पैकी ४.७ गुण मिळाले आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून नागरिकांना अधिक दर्जेदार, सुरक्षित, परिणामकारक आणि रुग्णाभिमुख आरोग्य सेवा मिळावी, यासाठी NQAS अंतर्गत विविध निकषांवर आरोग्य केंद्रांचे मूल्यांकन केले जाते.
पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राने या सर्वच बाबींमध्ये समाधानकारक कामगिरी करत राज्यस्तरीय मानांकन मिळविले आहे. केंद्रातील सेवा अधिक सक्षम करण्यासोबतच रुग्णांना वेळेत आणि आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला. आरोग्य केंद्र परिसरातील स्वच्छता, संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण, औषधांची उपलब्धता तसेच रुग्णांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल जोगळेकर, डॉ. प्रज्ञेश पाटील आणि डॉ. साक्षी बुलबुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ऋतुजा मुळे, जिल्हा गुणवत्ता नोडल अधिकारी डॉ. नलिनी ठोंबरे आणि जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. नेहा पेठकर यांनी गुणवत्ता मानांकनासाठी विशेष परिश्रम घेतले.
गुणवत्तापूर्ण आणि रुग्णकेंद्री आरोग्य सेवा हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, या उद्देशाने आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या यशामुळे नवी दिशा मिळाली आहे.
रणजित यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
विविध विभागांत उत्कृष्ट कामगिरी
NQAS मूल्यांकनात पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राने विविध विभागांमध्ये उच्च गुण मिळविले आहेत. बाह्यरुग्ण विभागाने (OPD) ९५.३३ टक्के, तर प्रयोगशाळेने ९४.३३ टक्के गुण मिळवले आहेत. Clinical Services मध्ये ९२.९१ टक्के, Infection Control मध्ये ९५.६६ टक्के, Quality Management मध्ये ९२.९२ टक्के आणि Outcomes मध्ये ९४.२८ टक्के गुण मिळाले आहेत. तसेच NHP विभागात ९२.३९ टक्के गुणांची नोंद झाली आहे.
रुग्ण समाधानाला विशेष प्राधान्य
आरोग्य सेवेची गुणवत्ता केवळ वैद्यकीय उपचारांपुरती मर्यादित न ठेवता रुग्णांना मिळणारा अनुभव आणि त्यांचे समाधान यालाही महत्त्व देण्यात आले. याचाच परिणाम म्हणून पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्ण समाधानाच्या निकषामध्ये ४.७/५ गुण मिळाले आहेत. रुग्णांशी सन्मानपूर्वक वागणूक, वेळेत सेवा, उपलब्ध सुविधा, स्वच्छता आणि आवश्यक उपचार यामुळे रुग्णांचा आरोग्य केंद्रावरील विश्वास वाढण्यास मदत झाली आहे.