
ठाणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच सय्यद अली यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मुंब्रा परिसरात विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले. काळे झेंडे दाखवित; पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत हजारो मुंब्रावासीयांनी रस्त्यावर उतरून दहशतवादी कृत्याचा निषेध केला.
काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शमीम खान आणि शानु पठाण यांच्या आवाहनानुसार हजारो मुंब्रावासीयांनी रस्त्यावर उतरून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. जुम्माचा नमाज अदा केल्यानंतर हजारो लोक सुरुवातीला कौसा जामा मशिदीबाहेर जमा झाले. तिथे निदर्शने केल्यानंतर रिझवी बाग मस्जिद, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय, तनवीर नगर येथे आंदोलन केले. या प्रसंगी शमीम खान यांनी रास्ता रोकोदेखील केला.
पहलगाम येथील हत्याकांडास जेवढे दहशतवादी जबाबदार आहेत. तेवढेच जबाबदार केंद्र सरकारही आहे. अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था डळमळीत का होती? येथील लष्कराचे जवान कुठे होते? पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या अंत्ययात्रा पाहून देशातील प्रत्येक घरात अश्रू दाटले. त्यामुळेच मुंब्रा- कौसातील बांधवांनी नमाज अदा केल्यानंतर प्रत्येक नाक्यावर पाकिस्तानचा निषेध करणारे आंदोलन केले. हे आंदोलन माणुसकीचे प्रतिक आहे.
- डॉ.जितेंद्र आव्हाड