पाकिस्तानी नागरिकांचा भिवंडीत वावर उघड; ९ जणांवर फौजदारी

काही महिन्यांपूर्वीच भिवंडी तालुक्यातील पडघा गावच्या हद्दीतून आयसिसच्या सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.
पोलिसांचे संग्रहित छायाचित्र
पोलिसांचे संग्रहित छायाचित्रTwitter

सुमित घरत/ भिवंडी

तालुक्यात २०१८ पासून ३० हून अधिक बांगलादेशी नागरिकांची धरपकड पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली असतानाच पाकिस्तानी नागरिकांचा भिवंडीत वावर असल्याचा प्रकार खळबळजनकपणे उघड झाला असून याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हारुन उमर परकार,अस्लम उमर परकार, आशिक अब्दुल रहमान परकार, अल्लाउद्दीन अब्दुल्लाह परकार, नाजीम कुरैशी, अशफाक अहमद मुशताक हाशमी, इजाज अहमद मुशताक हाशमी, हुसैन मेहमूद खान, रौफ हुसैन परकार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. एकंदरीतच भिवंडी शहर व ग्रामीण भागात दहशतवादीसह पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव उघड झाल्याने ठाणे जिल्ह्यासह मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे असल्याची चर्चा नागरिक करताना दिसत आहे. या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे यांच्याशी संर्पक साधला असता न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींना चौकशीसाठी बोलावून पुढील तपास पोलीस पथक करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हारुन आणि अस्लम हे दोघे भिवंडीत १९७१ पासून वास्तव्यास आहेत. ते दोघे पाकिस्तानी नागरिक असल्याचे माहीत असतानाही वरील ७ जणांनी त्यांना बनावट ओळखपत्र व इतर कागदपत्र बनवून देऊन अवैधरीत्या हारून व अस्लमला भारतात प्रवेश करून देवून भारताचे सुरक्षिततेस धोका निर्माण केला आहे. त्यामुळे या सर्वांवर ५ जून रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात असगर अली मोहम्मद आली अन्सारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ पासून ३० हून अधिक बांगलादेशींना बनावट शिधापत्रिका बनवून देवून पारपत्र देणाऱ्या चौघांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये आरोपी इरफान, संजय, नौशाद या तिघांना रविवारी २४ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र एटीएसच्या ठाणे युनिटने सापळा रचून ताब्यात घेऊन त्यांना ११ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. निजामपूरा पोलिसांनी शिधावाटप कार्यालयातील लिपिक दीपक कुमार खोकले (३५) यास सापळा रचून अटक केली होती. त्यास १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अटक केलेले हे बांगलादेशी नागरिक देशविघातक कृत्याशी संबंधित नसून केवळ रोजगाराच्या शोधातच ते शहरात आल्याचे आतापर्यंत समोर आले आहे.

शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशीसाठी बोलावून पुढील तपास पोलीस पथक करणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोउनि सुरेश घुगे करीत आहेत.

सहा दहशतवाद्यांना काही महिन्यांपूर्वीच अटक

गेल्या नवरात्री व दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क होऊन ठिकठिकाणी छापेमारी करीत होते. त्यावेळी देशविघातक व दहशतवादी कृत्यांना अर्थसहाय्य केल्याचा आरोप असलेल्या पीएफआय संघटनेच्या ३ पदाधिकाऱ्यांना भिवंडी शहरातून ठाणे एटीएसच्या अधिकाऱ्यांसह विविध गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले होते. भिवंडी तालुक्यातील पडघा गावच्या हद्दीतून आयसिसच्या सहा दहशतवाद्यांना काही महिन्यांपूर्वीच अटक करण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in