वसई-विरारसह पालघर, डहाणूचा विकास होणार ;जागतिक मराठी अकादमीच्या 'शोध मराठी मनाचा' संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

सूर्या पाणीपुरवठा योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले असून, यापुढेही वसई-विरारसह पालघर, डहाणूपर्यंतच्या विकासात निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरार येथे बोलतांना दिली.
वसई-विरारसह पालघर, डहाणूचा विकास होणार ;जागतिक मराठी अकादमीच्या 'शोध मराठी मनाचा' संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

अनिलराज रोकडे/वसई

मुंबई, ठाण्यानंतर नागरिकरणाचा प्रचंड ताण वसई, पालघर ते डहाणूपर्यंत वाढला असून त्यामुळेच मुंबई महानगर प्राधिकरणाचा विस्तार आवश्यक झाला आहे. सूर्या पाणीपुरवठा योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले असून, यापुढेही वसई-विरारसह पालघर, डहाणूपर्यंतच्या विकासात निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरार येथे बोलतांना दिली.

जागतिक मराठी अकादमी व विवा चॅरिटेबल ट्रस्ट विरार, यांच्या संयुक्त विद्यमाने आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने १९ वे जागतिक मराठी संमेलन ‘शोध मराठी मनाचा’ जुने विवा महाविद्यालय, विरार येथे दि. १३ व १४ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आले असून या संमेलनाचे उद्घाटन शनिवारी नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनास थोड्या उशिराने सहभागी झालेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे अध्यक्ष जपानचे आमदार, तथा एक यशस्वी मराठी उद्योजक योगेंद्र पुराणिक यांचा सत्कार करण्यात आला. पुराणिक यांना 'जागतिक मराठी भूषण सन्मान-२०२४' व ज्येष्ठ पत्रकार संजीवनी खेर यांना वि.वा.चॅरिटेबल ट्रस्टचा 'जीवन गौरव पुरस्कार(पत्रकारिता)' यावेळी देण्यात आला.

नरवीर चिमाजी आप्पांच्या पराक्रमाने पावन झालेल्या निसर्ग संपन्न वसई-विरारच्या भूमीत 'शोध मराठी मनाचा' हे संमेलन आणि त्यानिमित्ताने जगातील प्रगतीशील उद्योजकांचा परिचय, तथा गौरव होत असल्याचा आपल्याला आनंद वाटत असल्याचे सांगून, एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, एक अंबरनाथ येथील युवक नोकरीनिमित्ताने जपान येथे जाऊन अल्पावधित एक यशस्वी उद्योजक होतो.

शासन स्तरावर मराठी मायबोलीच्या समृद्धी आणि विकासासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत असून, गिरगांव चौपाटी येथे मराठी माणसाला गर्व वाटेल, असे सुंदर 'मराठी भाषा भवन' उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गतवर्षी जसे शासनाने पहिले 'मराठी विश्व साहित्य संमेलन' भरवून यशस्वी केले. यंदाही वाशी, नवी मुंबई येथे दुसरे जागतिक स्तरावरील संमेलन भरवून मराठी माणूस आणि भाषेची समृद्धी सर्वत्र पोहचवायचा, विकासाच्या माध्यमातून मराठी मने जोडण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे, असेही शिंदे म्हणाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी कार्यक्रमात संयोजक, तथा जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजेंद्र गावीत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार सुनील भुसारा, महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार, जिल्हाधिकारी गोविंद बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. हितेंद्र ठाकूर यांनी राजकारणातील जुन्या मैत्रीचा उल्लेख करत, १९९० सालापासून राणे हे माझे मित्र व वरिष्ठ आहेत. माजी मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री म्हणून ते काम करत आहेत. मित्र कसा असावा व संबंध कसे जपावे? हे त्यांच्याकडून शिकायला मिळते. नारायण राणेंनी कधी शब्दाला व मैत्रीला अंतर दिले नाही. राणे हे फक्त एका फोनवर कार्यक्रमाला उपस्थित राहिले असून मी त्यांचे आभार मानतो. आ. हितेंद्र ठाकूर

१९ वे जागतिक मराठी संमेलन’ हे वसई-विरारकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. जगभरात स्थिरावलेल्या मराठी माणसाला जोडणारे हे संमेलन आहे. मराठी माणसाची ख्याती ही सातासमुद्रापार पोहोचली आहे. महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा साजरी करणासाठी एकाच छताखाली सर्वजण एकवटले आहेत. मराठी माणूस हा जिथे-जिथे जाईल, तिथे आपला ठसा उमटवतो. - आमदार क्षितीज ठाकूर

logo
marathi.freepressjournal.in