पालघर जिल्ह्यात विदेशी दारू जप्तीची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि तलासरी पोलिसांची धडक कारवाई

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दापचरी तपासणी नाक्यानजीक विदेशी दारूने भरलेला ट्रक पोलिसांनी जप्त केला
पालघर जिल्ह्यात विदेशी दारू जप्तीची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि तलासरी पोलिसांची धडक कारवाई

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दापचरी तपासणी नाक्यानजीक विदेशी दारूने भरलेला ट्रक पोलिसांनी जप्त केला असून या कारवाईत एकूण एक कोटी सहा लाख ७२ हजार ४३४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यात आत्तापर्यंतची ही विदेशी दारूवरील सर्वात मोठी कारवाई आहे.

पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दापचरी सीमा तपासणी नाक्याजवळ पाळत ठेवली होती. पालघर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच तलासरी पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. हरयाणावरून मुंबईमार्गे गुजरातला जाणारा विदेशी दारूचा हा ट्रक पोलिसांनी पकडला. या ट्रकमध्ये अकराशे पेट्यांमध्ये हे विदेशी मद्य होते. ट्रकखाली करून त्याचा हिशेब करण्यास पोलिसांना सात-आठ तास लागले. ‘सेल फॉर पंजाब’ असे लिहिलेले मद्य हरयाणाहून मुंबईमार्गे गुजरातला आणि तिथून पंजाब असा द्राविडी प्रकार कशासाठी चालला होता, हे गूढच आहे.

पालघर जिल्ह्यातील अनेक तालुके हे गुजरातच्या सीमेनजीक आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात दमणची बनावट दारू विकली जात आहे. वास्तविक बिअर शॉपमध्ये फक्त बिअर विकायला परवानगी असताना येथे अनेक प्रकारच्या देशी, विदेशी मद्याची विक्री केली जाते. त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही.

सीमेपलीकडून चोरट्या मार्गाने दमणची बनावट दारू येत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र केवळ तात्पुरती कारवाई करीत आहे.

ट्रकचा क्रमांकही बनावट

विशेष म्हणजे या ट्रकला लावलेली क्रमांकाची पाटी बनावट होती. बनावट क्रमांक वापरून या ट्रकमधून विदेशी दारूची वाहतूक केली जात होती, हे तपासात उघड झाले आहे. तलासरी पोलिसांनी अवैध दारू वाहतूक तसेच बनावट क्रमांकाचा वापर आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांची कारवाई आणि उत्पादन शुल्क विभाग थंड

स्थानिक पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत दारू विक्रीची माहिती मिळत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाला ती माहिती का मिळत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही महिन्यांत पालघर जिल्हा पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अवैध मद्य तसेच अन्य प्रकरणात कारवाई केली असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाला मात्र आत्तापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात यश का आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in