संतोष पाटील/वाडा
पालघर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची पातळी झपाट्याने खालावत असल्याने आठ धरणांमध्ये निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक असल्याचे बोलले जाते. पावसाळा येईपर्यंत पाटबंधारे विभागाला पाणीपुरवठा करताना काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.
पालघर जिल्ह्यातील धामणी, कवडास, वांद्री ही प्रमुख धरणे असून मनोर, माहीम-केळवा, देवखोप, रायतळे, खांड, देवखोप आणि मोह खुर्द हे बंधारे आहेत. तीन धरणांत मिळून ३२२.२४८ दलघमी क्षमता आहे. २ एप्रिलपर्यंत तिन्ही धरणांत १५६.७९२ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. धामणी धरणात ४७.६३ टक्के, कवडास धरणात ४४.७८ टक्के तर वांद्री धरणात ५७. ६१ टक्के पाणीसाठा आहे.
एप्रिल महिन्यातच या धरणांमधील पाणीसाठा निम्म्यापेक्षा खाली आला असून, पालघर पाटबंधारे विभागाला पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे, तर पाणीपुरवठा होणाऱ्या व करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना ही पाण्याबाबतची खबरदारी घेणे आवश्यक ठरणार आहे. नागरिकांनी देखील काटकसरीने पाणी वापरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
धरणातील सद्यस्थितीतील पाणीसाठा
धरणाचे नाव - पाणीसाठा (दलघमी) - टक्केवारी
धामणी - १३१.६२८ - ४७.६३%
कवडास - ४.४६० - ४४.७८%
वांद्री - २०.७०४ - ५७.६१%
मनोर - ०.९७९ - ३९.४०%
माहीम-केळवा - १.७३२ - ५३.४२%
देवखोप - १.३७० - ४१.७०%
रायतळे - ०.६४४ - ३४.३५%
खांड - २.४१५ - ५३.६७%
मोहखुर्द - १.७४० - ३६.५९%