प्रत्येक शाळेत आता पॅनिक बटण! बदलापूरच्या 'त्या' शाळेतील १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब - केसरकर

बदलापूर येथील शाळेतील घटना निंदनीय आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा करण्यात आली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

मुंबई : बदलापूर येथील शाळेतील घटना निंदनीय आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा करण्यात आली. भविष्यात अशाप्रकारच्या घटना टाळण्यासाठी आणि शाळेतील महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे. महिला किंवा मुलींना असुरक्षित वाटत असल्यास, बटण दाबल्यास संबंधित पोलीस ठाण्यात अलार्म वाजणार आहे. हे बटण जर आम्ही देऊ शकलो तर निश्चितपणे महिला अत्याचार नियंत्रणामध्ये येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दरम्यान, शाळेतील गेल्या १५ दिवसांतील सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचेही त्यांनी मान्य केले.

बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराचे १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याची धक्कादायक माहिती शिक्षण विभागाच्या चौकशीतून समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचा अहवाल पोलिसांना पाठवला असून मंगळवारी अहवाल अपेक्षित असला तरी गोपाळकालानिमित्ताने सुट्टी असल्याने बुधवारी या अहवालावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केसरकर यांनी दिली.

बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या घटनेचा निषेध सर्वच स्तरातून होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये कठोर नियमावली तयार केली आहे. बदलापूर घटनेतील मुलीची ओळख उघडकीस येणार नाही, याची काळजी घेऊन दोन्ही मुलींना सर्व प्रकारची मदत केली जाईल. बदलापूर अत्याचाराच्या घटनेतील मुलीला १० लाखांची मदत केली जाईल आणि जिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाला, तिला तीन लाखांची मदत करणार आहे. दोघींच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी आम्ही उचलू. त्यासाठी लागणारी आर्थिक मदत दर महिन्याला धनादेश स्वरूपात देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आरोपी अक्षय शिंदे याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी त्याला कल्याण येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीशांनी हा आदेश दिला. २१ ऑगस्ट रोजी आरोपीला न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर आरोपीला पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, न्यायालयाच्या परिसरात आणि न्यायालयाच्या आत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. एसआयटी पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यामध्ये अजून काही आरोपींचा समावेश होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

त्या ड्युटीवर असत्या तर हे घडलेच नसते!

मुलींना शौचालयात घेऊन जाण्याची जबाबदारी कामिनी गायकर आणि निर्मला भुरे या दोन सेविकांवर होती. मात्र त्या दोघी चौकशीला उपस्थित नव्हत्या. याचा अर्थ त्यांना काही बोलायचे नाही, असे गृहित धरून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या दोघी ड्युटीवर असत्या तर ही घटना घडली नसती. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना सहआरोपी करण्यासाठी निर्देश दिल्याचे केसरकर यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in