'मिनरल वॉटर'च्या जमान्यात पाणपोई लुप्त; गोरगरीब, सामान्यांचे उन्हाळ्यात हाल

पूर्वीच्या काळी घराबाहेर पडल्यानंतर लाल रंगाच्या फडक्याने झाकून ठेवलेले रांजण, माठ, त्यावर लाकडी झाकण आणि पाणी पिण्यासाठी रंगीबेरंगी प्लास्टिक ग्लास असलेली पाणपोई शहरात अनेक ठिकाणी दिसत होत्या, उन्हाळ्यात तर असे रांजण जागोजागी दिसायचे.
'मिनरल वॉटर'च्या जमान्यात पाणपोई लुप्त; गोरगरीब, सामान्यांचे उन्हाळ्यात हाल

जव्हार : जव्हार शहरात तापमानात वाढ झाली असून, उन्हाळ्याची चांगलीच चाहूल लागली आहे, रस्त्यावरून जाणाऱ्या, येणाऱ्यांची तहान भागविण्यासाठी पूर्वी पाणपोईची सुविधा सुरू केली जायची. सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अनेक संस्था-संघटना आणि दानशूर व्यक्ती स्वखर्चाने अशा पाणपोई सुरू करायच्या; मात्र गेल्या काही वर्षांत रस्त्या-रस्त्यावर दिसणाऱ्या पाणपोई जणू गायबच झाल्याचे चित्र असून, सध्या सगळीकडेच जारची मागणी वाढत आहे.

पूर्वीच्या काळी घराबाहेर पडल्यानंतर लाल रंगाच्या फडक्याने झाकून ठेवलेले रांजण, माठ, त्यावर लाकडी झाकण आणि पाणी पिण्यासाठी रंगीबेरंगी प्लास्टिक ग्लास असलेली पाणपोई शहरात अनेक ठिकाणी दिसत होत्या, उन्हाळ्यात तर असे रांजण जागोजागी दिसायचे. त्या रांजणांमधील नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले पाणी प्यायले की तहान भागायची. तहानलेल्यांना पाणी पाजणे ही आपली संस्कृती आहे. या संस्कृतीला अनुसरूनच समाज कार्यात अग्रेसर संस्था-संघटना, दानशूर व्यक्ती सामाजिक जबाबदारीचे भान जपत वाटसरूंना प्यायचे पाणी उपलब्ध करून द्यायचे.

दरम्यान, त्याकाळी शहरात रहदारीचे रस्त्यावर, आठवडी बाजार अशा अनेक ठिकाणी पाणपोई दिसायची. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंची, गरीब कष्टकऱ्यांची चांगली सोय होत होती; मात्र बिघडलेले निसर्गचक्र, पावसाचे घटलेले प्रमाण, कमी झालेले वृक्षसंवर्धन, पाण्याचा बेसुमार उपसा यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ आपल्या सर्वांवर आली आणि पाण्याचा असा 'व्यापार' सुरू झाल्यामुळे पाणपोईची जागा जार व बाटलीबंद पाण्याने घेतली. या व्यवहारात मोफत सुविधा असणाऱ्या पाणपोई लुप्त झाल्या. बाटलीबंद 'मिनरल वॉटर' पिण्याची फॅशन आल्यामुळे पाणपोईचे पाणी पिणे अनेकांना आता कमीपणाचे वाटते. त्यामुळे शुद्ध व थंडगार पाणी सर्वांना मिळावे म्हणून पाणपोई पुन्हा सुरू करण्याची गरज आहे, असे वृद्ध नागरिक बोलत आहेत.

आमच्या लहानपणी प्रत्येक गावागावांतील बस थांब्यावर, गाव-पाड्यात पाणपोई दिसायची. आता मात्र पाण्याच्या बाटल्या असलेली दुकाने दिसत आहेत. पाणपोई सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

-लक्ष्मण काळे, ज्येष्ठ नागरिक

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in