

ठाणे : शिक्षणाचा हक्क कायदा (आरटीई) २००९ अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेच्या २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी प्रतीक्षाधीन (वेटिंग लिस्ट) विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या फेरीस ४ जून ते १२ जून असा कालावधी देण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार तसेच शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षाधीन यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दुसरी फेरी सुरू करण्यात आली आहे. या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरटीई प्रवेश पोर्टलवरील माहितीनुसार निश्चित कालावधीत संबंधित शाळेत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. मुदतीत प्रवेश निश्चित न केल्यास संबंधित जागा पुढील पात्र विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिली जाईल.
प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांनी निवासाचा पुरावा, जन्मनोंद प्रमाणपत्र, आधार कार्ड तसेच शासनाने निर्देशित केलेली इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग अथवा आरटीई हेल्पडेस्कशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा शासनाचा उद्देश असून, पात्र पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.
शिक्षणाचा अधिकार हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांपर्यंत पोहोचत आहे. प्रतीक्षाधीन यादीतील दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विहित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा.
रणजित यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
केडीएमसी शिक्षण विभागाचे आवाहन
कल्याण : RTE अंतर्गत २५ टक्के जागांवरील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू असून प्रतीक्षा यादीतून निवड झालेल्या बालकांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी कागदपत्र पडताळणीसाठी कै. शंकरराव झुंजारराव मनपा शाळा क्रमांक १, गांधी चौक, बारदान गल्ली, कल्याण (पश्चिम) येथे केंद्र निश्चित करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत, कार्यालयीन व शासकीय सुट्ट्या वगळता, पडताळणी प्रक्रिया पार पडणार आहे. १२ जूनपर्यंत पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भारत मनसाराम बोरनारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.